वनविभागाकडून घटनास्थळी दोन पिंजरे
नाशिक दिनकर गायकवाड दिंडोरी शहरातील बदादे वस्तीवर बिबट्याच्या हल्ल्यात महिलेच्या मृत्यूनंतर नागरिकांना चांगलाच संताप व्यक्त केल्याने वनविभागाने तत्काळ दखल घेत बिबट्याच्या बंदोबस्तांसाठी बदादे वस्तीवर दोन पिंजरे तात्काळ लावले आहे.
बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करून नागरिकांमधील भिती कमी करण्यात येईल,असे वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुशांत पाटील यांनी माहिती देताना सांगितले.
दिंडोरी परिसरात तीन महिन्यात बिबट्याने चौघांचा बळी घेतल्याने नागरिकांनी वनविभागाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे.
नुकताच दिंडोरी शहरातील बदादे वस्तीवर ६५ वर्षीय महिलेवर बिबट्याने हल्ला करून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. दिंडोरी शहरात बिबट्याच्या हल्ल्यात चौथा बळी गेल्याने तीव्र संताप उसळला असून मयत महिलेचे नातेवाईकांनी वनविभागाच्या कार्यालयासमोर मृतदेह आणून रास्ता रोको आंदोलन केले.
या आंदोलन प्रसंगी वनपरिक्षेत्र अधिकारी सुशांत पाटील यांनी तत्काळ पिंजरे लावून बिबट्यांचा बंदोबस्त करण्यात येईल,असे आश्वासन दिले होते.त्यांनी तत्काळ दखल घेत बदादे वस्तीवर दोन पिंजरे लावण्याचे आदेश दिले होते दिंडोरी परिसरातील ज्या ठिकाणी बिबट्याचे वास्तव्य आहे त्या ठिकाणी पिंजरे चसविण्यात येतील,असे वनपरिक्षेत्र अधिकारी सुशांत पाटील व वनपाल अशोक काळे यांनी सांगितले.