नाशिक दिनकर गायकवाड गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जिल्ह्यातील काही भागांत वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यावेळी वाऱ्यामुळे कळवण तालुक्यातील रवळजी येथील दोन शेतकऱ्यांचा ७ एकर मका जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
वादळी शेतकरी बबन वाघ यांच्या शेतातील सुमारे चार एकर व दीपक जाधव यांच्या शेतातील तीन एकर मकाचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला होता.
कळवण तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे.वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे व सोसाट्याचा वारा सुटल्याने तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील मका भुईसपाट झाला आहे तर खरीप पिकांचेही नुकसान झाले आहे.
रवळजी येथील बबन वाघ, दिपक जाधव या शेतकऱ्यांचा मका जमीनदोस्त झाल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. त्यामुळे महसूल प्रशासनाने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करावेत व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी शासनाला तसा अहवाल पाठवावा,अशी मागणी रवळजी येथील शेतकरी बबन वाघ, दिपक केदा जाधव, बापू जगताप, रविंद्र भालेराव यांनी केली आहे.
