नाशिक दिनकर गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथे आयोजित एका कार्यक्रमात मांसाहाराविषयी केलेल्या विधानाने वातावरण चांगलेच तापले आहे. या वक्तव्यावरून विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
वारकरी संप्रदायाने आंदोलनाचा इशारा दिला आहे. कोणी काय खावे याकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही,असे संयमी प्रत्युत्तर देत मंत्री छगन भुजबळ यांनी अधिक बोलणे टाळले.सुळे यांनी आपल्या भाषणात म्हटले,मी 'राम कृष्ण हरी' वाली आहे फक्त माळ घालत नाही,
कधी-कधी मटण खाते,खरे बोलते.यावर येवला येथे पत्रकारांशी बोलताना राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री भुजबळ यांनी या वादावर प्रतिक्रिया दिली.कोणी काय खावे याकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही.असे सांगत भुजबळांनी अधिक बोलणे टाळले.
सुप्रिया सुळे यांच्या या वारकरीच उत्तर देतील असे शिक्षण मंत्री दादा भुसे म्हणाले सुप्रिया सुळे यांनी मांसाहाराबाबत केलेल्या विधानावरून खाणे किंवा इतर विषयांना त्याचा संदर्भ जोडणे योग्य नाही,मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे वारकरीच त्याला योग्य उत्तर देतील असे मंत्री दादा भुसे म्हणाले.
नाशिकला बैठकीसाठी आले असता पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील विधान केले.मात्र खासदार सुळे यांच्या विधानाने सामाजिक आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.आळंदीचे बाळासाहेब महाराज खरात यांनी सुळे यांच्या विधानाचा तीव्र निषेध केला.
ते म्हणाले, बापाने कधी पांडुरंगाच्या चरणी डोकं टेकलं नाही, तर मुलीकडून काय अपेक्षा करणार? सुळे यांनी या वक्तव्याबद्दल माफी मागावी, अन्यथा, वारकरी संप्रदाय त्यांच्या विरोधात मोठे आंदोलन उभे करेल. खरात यांच्या या इशाऱ्याने वाद आणखी तीव्र झाला आहे.
या वादात भाजपनेही उडी घेतली आहे.भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी सुळे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. पांडुरंगाला मांसाहार चालतो हे बोलणे म्हणजे निव्वळ मूर्खपणा आहे. तुम्ही वारकरी परंपरेचा सन्मान करू शकत नाही तर किमान अपमान तरी करू नका, पण, शरद पवारांच्या मुलीकडून दुसरी काय अपेक्षा करणार?असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे.
