मुंबईत आदीवासी स्वाभिमान सभेत शरद पवारांची उपस्थिती
मुंबई सिटीलाईन न्यूज नेटवर्क'जागतिक आदिवासी दिना'निमित्त पक्षाच्या आदिवासी विभागाच्या वतीने मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित 'आदिवासी स्वाभिमान सभेत' राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार आवर्जून सहभागी झाले. सभेला संबोधित करताना "आत्मविश्वासाने भरलेलं आदिवासी संघटन उभं करण्यासाठी तयारीला लागा" असं आवाहन उपस्थितांना त्यांनी यावेळी केले.
प्रसंगी राज्याचे अध्यक्ष शशिकांत शिंदे, लोकसभेचे खासदार भास्कर भगरे, सुनील भुसारा, रवींद्र पवार, रोहित पवार, सतीश पेंदाम,आदिवासी विभागाची जबाबदारी ज्यांनी आपल्या खांद्यावर घेतली ते प्रदेशाध्यक्ष जयवंत वानोळे,डॉ.चंद्रकांत बारेला,पंकज ठाकरेसह इतर उपस्थित मान्यवर उपस्थित होते
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की या देशाचा जो मूळ निवासी आहे, मूळ मालक आहे त्याचा सन्मान करण्याचा कालचा दिवस होता.तो दिवस ठिकठिकाणी साजरा केला गेला. ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे, कदाचित त्यांना विश्वास झाला असेल. या देशातल्या सामान्य माणसाला आदिवासींचं योगदान हे माहिती आहे. त्यामुळे सर्वत्र कालच्या दिवसामध्ये आदिवासींचं स्मरण केलं गेलं.आज अनेक प्रश्न आहेत की,ज्या प्रश्नांमुळे आदिवासींना यातना सहन कराव्या लागतात.
आमदार रोहित पवारांनी बोलत असताना सांगितलं चंद्रपूर जिल्ह्यातील सुरजागड लोहखनीज खाणी.या देशाचं वैशिष्ट्य आहे. ही जिथे संपत्ती आहे, ती संपत्ती दोन प्रकारची आहे.एक भूगर्भातील संपत्ती आणि दुसरी या देशातील कोट्यवधी लोकांना तहान भागवणारी त्यांची जी गरज आहे,ती पाण्याची संपत्ती.तिसरी या देशाच्या पर्यावरणाचा प्रश्न ज्यांनी जंगल राखून सोडवला, तो वनाचा प्रश्न. या सगळ्यांभोवती कोण सहभागी झालं असेल? कुणाचं योगदान असेल? कुणी त्याग केला असेल? याचा आढावा आपण घेतला तर, एकच नाव निघतं आदिवासी! हा देश आदिवासींचा देश आहे. त्यामुळे तो काय दुसरं काही मागत नाहीये, तो त्याचा अधिकार मागतो. तो त्याचा सन्मान मागतो आणि सन्मानाने जगण्याची संधी ही त्यांना मिळाली पाहिजे, यासंबंधीची भूमिका हा ठिकठिकाणी मांडतो.
अनेकांनी नेतृत्व केलं,आदिवासींच्या प्रश्नांसाठी.त्या प्रत्येक नेत्याचा पूर्ण इतिहास जर आपण बघितला तर, तो अन्यायाच्या विरुद्ध लढण्याचा होता. राघोजी भांगरे असो,बिरसा मुंडा असतील,जे अलीकडेच गेलेले आणि एकेकाळी माझेही सहकारी होते (आम्ही एका मंत्रिमंडळात होतो) ते शिबू सोरेन असोत.या प्रत्येक माणसाने संघर्ष केला, उभं आयुष्य दिलं आणि 'आदिवासींच्या हक्कांच्या संबंधीची जागृती' ही या देशामध्ये केलेली होती. आज आपल्याला अधिक लक्ष द्यावं लागणार आहे.
हा आदिवासी विभाग राष्ट्रवादी काँग्रेसने स्थापन केला आणि त्याची जबाबदारी जयवंत वानोळे आणि बाकीच्या सहकाऱ्यांवर दिली.त्याच्यामागे आम्हा लोकांच्या मनात काही कल्पना आहेत. मला त्यांना सुचवायचं आहे की,येत्या महिन्या दोन महिन्यांमध्ये या राज्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये तुम्ही संघटन उभं करा. तरुण आदिवासींचं संघटन करा,त्यांच्याशी सुसंवाद साधा. त्यांचे प्रश्न काय आहेत? ते जाणून घेऊया आणि ते सोडवण्यासाठी जे व्यासपीठ असेल, मग ते जिल्ह्याचं असेल, जे राज्याचं असेल, जे देशाचं असेल त्या ठिकाणी या प्रश्नांची मांडणी आपण करूया आणि हक्क म्हणून.. लाचारी नको! आम्हाला भीक नको, आम्हाला आमचा अधिकार म्हणून या सगळ्या प्रश्नांची सोडवणूक करून घेऊन लोकांचं जीवन बदलायचंय, हा निर्धार आपल्या सगळ्यांना करायचा आहे आणि त्यासाठी आवश्यक असेल ते सगळं करुया असे श्री.पवार यांनी स्पष्ट केले.
दरम्यान अनेकांनी भाषणं केली.त्यात सतीश पेदांम यांचे भाषण तुम्ही ऐकलं. त्यांच्या कार्यक्रमाला मी गेलो होतो. मध्यप्रदेशमध्ये गेलो,नागपूरला गेलो. आश्चर्य वाटेल, लाख- लाख तरुण युवक युनिफॉर्ममध्ये आणि शिस्तीमध्ये त्या ठिकाणी उभे राहतात. आपापल्या भागातले अन्याय- अत्याचारांचे प्रश्न आहेत, ते सोडवण्यासाठी शपथ घेतात आणि आपल्या आयुष्यातला उमेदीचा काळ हा सगळा या कामाला झोकून देतात.कशाचीही अपेक्षा नाही.आत्ता तुम्ही त्यांचे विचार ऐकले,त्यांनी वाहून घेतलंय या सर्व कामांसाठी.. त्यांचं शिक्षण किती झालं? याची माहिती घेतली तर, ते 'इंजिनीअर' आहेत. आम्ही त्यांना नेहमी सांगतो भेटल्यावर की "आता एकटं किती दिवस लढणार? तुम्ही इंजिनीअर आहात, तुम्ही समाजाचं काम करत आहात. एखादं जोडीदार सुद्धा बघा आणि लग्न करून टाका" पण त्यांनी इरादा केला आहे की, आदिवासींना संघटित करायचं. त्यांचे प्रश्न शास्त्रशुद्ध रीतीने मांडायचे. अगदी 'युनो' पर्यंत आदिवासींच्या प्रश्नांची मांडणी करण्याची आवश्यकता आहे. हे सूत्र सतीश पेदांम यांनी देश पातळीवर मांडलेलं होतं. त्यामुळे आज यांचा आदर्श घेऊन, आपल्या तरुणांचा संच उभं करून सबंध देशाचं आणि आदिवासींचं चित्र हे आपल्याला बदलायचं आहे. त्या कामाला लागण्याची जबाबदारी आज आपल्याला घ्यायची आहे.
मी एवढंच सांगू इच्छितो विशेषतः जयवंत वानोळे यांना, डॉ. बारेला यांना की,आता या कामामध्ये एक सूत्रबद्धता पाहिजे.या कार्यक्रमामध्ये कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास हा वाढवला पाहिजे. शशिकांत शिंदे, आमदार रोहित पवार, सुनील भुसारा, रवींद्र पवार या सगळ्यांना एवढंच सांगू इच्छितो, तुमची जबाबदारी खेड्या पाड्यात जंगलात राहणारे लहान कार्यकर्ते असतात.तर त्यांचा सन्मान जपा, सन्मानातून हे करा,त्यांना संधी द्या! अनेक दृष्टींनी त्यांच्यात कर्तुत्व आहे, काम करण्याची तयारी आहे. फक्त संधी द्या आणि एक नवीन आदिवासी क्षेत्र, आत्मविश्वासाने भरलेलं नेतृत्व कुठे आहे? तर ते राष्ट्रवादीकडे आहे.हि भुमिका लोकांनी मांडली पाहिजे, याची तयारी तुम्ही करा.असेही अंतिमतः शरद पवार म्हणाले.