नाशिक दिनकर गायकवाड चाकूने हातांवर वार करून अज्ञात चोरट्यांनी हॉटेल व्यावसायिकाच्या खिशातील ५० हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरून नेल्याची घटना भाभानगर परिसरात घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी,की फिर्यादी हेमंत मनोहर कुलकर्णी (वय ५६, रा.भाभानगर, मुंबई नाका, नाशिक) हे दि. २१ ऑगस्ट रोजी नेहमीप्रमाणे हॉटेल बंद करून ॲक्टिव्हा दुचाकीवरून घरी जात होते.
रात्री सव्वाअकरा वाजेच्या सुमारास ते भाभानगर येथील मेड प्लस मेडिकल जवळ आले असता त्यांच्या पाठीमागून दुचाकीवरून दोन अनोळखी इसम आले.त्यांनी कुलकर्णी यांच्या गाडीच्या पुढे स्वतःची गाडी आडवी लावून कुलकर्णी यांच्या गाडीला धक्का दिला व आडवी पाडली.
त्यावेळी त्या चोरट्यांनी कुलकर्णी यांची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला.ती ओढत असताना दुचाकीवरील चोरट्यांनी कुलकर्णी यांच्या हातावर चाकूने वार करून त्यांच्या खिशातील ५० हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरून नेला.या घटनेत कुलकर्णी जखमी झाले. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.