- सामाजिक कार्यकर्ते बबन कराड यांचा इशारा : महिला ग्रामस्थही उतरतील रणांगणात!
आश्वी संजय गायकवाड संगमनेर तालुक्यातील पानोडी गावच्या ग्रामसभेत दि. ४ मार्च २०२५ रोजी एकमुखाने संमत झालेल्या दारूबंदी ठरावाला तब्बल सहा महिने उलटून गेले,मात्र पोलिस प्रशासनाकडून अद्याप ठोस उपाययोजना झालेली नाही. त्यामुळे हा ठराव फक्त कागदावरच राहिल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे त्यातून राज्य उत्पादन शुल्क विभागाचा कारभाराबद्दल सुज्ञ नागरिक शंका व्यक्त करत आहे.
अवैध दारु विक्रीमुळे गावातील तरुणाईचा होत असलेला ऱ्हास, महिलांचा छळ,वाढते गुन्हे आणि सामाजिक अस्वस्थता यावर नियंत्रण आणण्यासाठी ग्रामस्थांनी खास ठराव केला होता.मात्र सहा महिन्यांपासून पोलिस व शासन यंत्रणेकडून ठोस कारवाई न झाल्याने ग्रामस्थांमध्ये संताप उसळला आहे.
सामाजिक कार्यकर्ते बबन कराड यांनी ठाम शब्दात इशारा दिला आहे की, “जर प्रशासनाने तातडीने अवैध दारु विक्रेत्यांविरोधात कडक कारवाई केली नाही तर पानोडीतून व्यापक आंदोलन उभारुन ते जिल्ह्यापर्यंत तिव्र करु या आंदोलनात पानोडी गावातील महिला ग्रामस्थ तसेच सरपंच उपसरपंच सदस्य सेवा संस्थेचे सर्व पदाधिकारी सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते देखील आघाडीवर राहतील आणि दारुबंदीची लढाई शेवटपर्यंत लढतील,असा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.
गावकऱ्यांचे म्हणणे आहे की, “दारूबंदी ठराव हा फक्त कागदावर न राहता प्रत्यक्षात उतरला पाहिजे.अन्यथा पोलिस व शासनाने गावकऱ्यांच्या संयमाची कसोटी पाहू नये.”पानोडीकरांचा प्रश्न स्पष्ट आहे – ठराव होऊन सहा महीने झाले तरीही जर प्रशासनाकडून कारवाई होत नसेल तर ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरणार आहेत.
“दारू हद्दपार – गाव स्वच्छदार” अशा घोषणांनी गावातूनच आंदोलन पेट घेणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.पानोडी ग्रामस्थांच्या या लढ्यामुळे आता पोलिस व शासन प्रशासनावर जबाबदारीचे ओझे अधिक वाढले असून, ग्रामस्थांच्या एकतेसमोर अवैध दारु विक्रेत्यांना थारा नाही हे पुन्हा अधोरेखित झाले आहे.
