अहिल्यानगर (प्नतिनिधी) येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात आज अरुण कडू यांचा जीवन गौरव समारंभ पार पडला.यावेळी कडू पा.यांनी केलेल्या संघर्षावर आधारीत संपादीत केलेल्या 'संघर्षयात्री' गौरव विषेशांकाचे प्रकाशन पद्मविभूषण खा. शरदचंद्र पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ,काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे मा. विधान परिषद सदस्य डॉ सुधीर तांबे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
अरुण कडू पा. हे गेल्या पन्नास वर्षांहून अधिक काळ ते समाजकारण आणि राजकारणात सातत्याने कार्यरत आहेत. त्यांनी केवळ जबाबदाऱ्या पार पाडल्या नाहीत तर त्या जबाबदाऱ्यांवर आपली ठसठशीत छाप उमटवली आहे.
अरुण कडू हे महाराष्ट्रातील ख्यातनाम साम्यवादी नेते कॉ. पी. बी. कडू पाटील यांचे सुपुत्र. वडिलांप्रमाणेच त्यांनीही आयुष्यभर साम्यवादाच्या मूल्यांना आत्मसात केले. वडिलांनी स्वातंत्र्य लढ्यात भूमिगत चळवळीत भाग घेतला. तुरुंगवास भोगला आणि शोषित-गरिबांसाठी लढा दिला. हाच विचार आणि लढ्याची आग अरुण कडू यांच्या जीवनातही सळसळत राहिली. सुरुवातीच्या काळात त्यांनी कम्युनिस्ट पक्षात अत्यंत प्रामाणिकपणे कार्य केले. लोकसभेची निवडणूक लढवली. पुढे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवारांच्या नेतृत्वाखाली त्यांनी आपल्या राजकीय वाटचाल सुरू केली.
कॉम्रेड म्हणजे सहकारी,मित्र, संघर्षसाथी.अरुण हे या शब्दाचे खरे आणि संपूर्ण अर्थाने प्रतीक आहेत. ते सच्चे मित्र, संकटात साथ देणारे,अन्यायाविरुद्ध ठामपणे उभे राहणारे व्यक्तिमत्त्व आहेत. साधेपणा, प्रामाणिकपणा, संयम, निस्वार्थी सेवा आणि प्रसिद्धीपासून दूर राहून काम करत राहणे हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे खरे पैलू.
अरुण कडू पा.
जेव्हा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले तेव्हा अध्यक्षांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा मिळाला.यामागे महत्त्वाचं कारण होतं अनेकदा प्रशासन विशेषतः जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी अध्यक्षांचे म्हणणे पाळत नसत.त्यामुळे अध्यक्षपदाला सन्मान मिळावा, निर्णयक्षमता वाढावी म्हणून हा दर्जा देण्यात आला.
मात्र, अरुण हे कदाचित एकमेव अध्यक्ष असावेत त्यांनी कधीही पदांचा गर्व केला नाही. न ‘लाल दिवा’ वापरला, न ‘नामदार’ उपाधी लावली हे त्यांचं आत्मभान आणि नम्रतेचं प्रतीक.हल्ली अरविंद केजरीवाल यांनी लाल दिवा वापरणे बंद केले व नंतर सर्वच मंत्री महोदयांनी लाल दिवा गाडीवर लावणे बंद केले.
परंतु अरुण हे देशातील पहिले नेते असावेत ज्यांनी स्वतःहून लाल दिवा वापरणे बंद केले. त्यांच्या कार्यकाळात जिल्हाभर दौरे केले, अनेक प्रश्न सोडवले आणि प्रशासनात कार्यक्षमतेचा नवा आदर्श निर्माण केला.
रयत शिक्षण संस्थेतील त्यांचे योगदानही लक्षणीय आहे. त्यांच्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांनी उत्तर विभाग प्रमुख म्हणून संस्थेच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता आणि मूल्यनिष्ठा जपली. राजकारणातही त्यांनी वडिलांचा वारसा जपताना त्याग, साधेपणा, निडरपणा,
अन्यायाविरुद्ध संघर्ष आणि पदांचा मोह न बाळगता लोकसेवा हीच सर्वोच्च जबाबदारी मानली.चंद्रभान घोगरे, शंकरराव खर्डे, रावसाहेब म्हस्के, एकनाथ घोगरे, अशोक तांबे यांच्यासोबत प्रवरा परिसरातील अनेक मोठ्या नेत्यांसोबत त्यांनी संघर्ष केले, आंदोलन उभारली आणि आजही त्याच तडफेने अन्यायाविरुद्ध आवाज उठवत आहेत. राजकीय लढ्यांमध्ये ते केवळ सत्तेसाठी नव्हते तर शेतकरी, कामगार, आणि सामान्य सभासदांच्या न्यायासाठी होते.
शारीरिक अडचणी असूनही त्यांनी कधीही विश्रांती घेतली नाही. त्यांचं कार्य हे त्याग, निष्ठा आणि धैर्य यांचं प्रतीक आहे. आज ते कम्युनिस्ट पक्षात नसले तरी त्यांच्या वागण्यात, विचारात, आणि कृतीत तोच तत्वप्रिय विचार झळकतो. अरुण कडू दैववाद आणि अंधश्रद्धांविरुद्धही ठाम भूमिका घेतली.
त्यांनी देव मानला नाही पण ‘देवत्व’ जपलं माणुसकी, करुणा, साधेपणा आणि सेवा या रुपात.त्यांनी वारकऱ्यांचा शुद्ध आत्मा, मानवता आणि सामाजिक समता आपल्यात रुजवली.
स्वामी विवेकानंद म्हणतात, "मी त्या ईश्वराचा सेवक आहे ज्याला अज्ञानी लोक ‘माणूस’ समजतात." त्या अर्थाने अरुणराव हे खरे देवमाणूस आहेत. आज राजकारण म्हणजे प्रतिष्ठा, पद, ग्लॅमर याचं साधन बनलं आहे. पण अरुण कडू “राजकारण म्हणजे समाजसेवेचं माध्यम” आहे हे आयुष्यभर कृतीतून दाखवून दिलं.
हा समारंभ म्हणजे त्यांच्या त्या निस्वार्थी कार्याची, निष्ठेची आणि तत्त्वप्रियतेची मानवंदना आहे. असे मत शरद पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.