अत्त दीप भव
जीवन दुःखमय आहे. दुःखाचे निवारण करून आनंदी जीवन जगण्यासाठी प्रत्येकजण धडपडत असतो. दुःख हि जशी वैयक्तीक बाब आहे तशीच ती सामाजिक देखील आहे. व्यक्ती आणि समाज सुखी, समाधानी रहावा यांसाठी अनेक महामानवांनी प्रयत्न केले आहेत. दुःखाची खरी कारणे शोधून दुःख निवारणाचा मार्ग सांगणाऱ्या धम्माचे नाव आहे बौध्द धम्म.हा मार्ग सांगणाऱ्या महामानवाचे नाव आहे भगवान गौतम बुध्द.
थेरवाद परंपरेनुसार भगवान गौतम बुध्द यांचा जन्म इ. स.पूर्व ५६३ मध्ये झाला. त्यांचे जन्मनाव सिध्दार्थ होते. कपिलवस्तूचा शाक्य राजा शुद्धोधन हे त्याचे वडील तर आईचे नाव महामाया . सिद्धार्थाच्या जन्मानंतर अवघ्या सातव्या दिवशीच त्यांची आई महामाया यांचे निधन झाले. सिद्धार्थाचा सांभाळ त्यांची मावशी व सावत्रआई महाप्रजापती गौतमी यांनी केला. त्यामुळे सिद्धार्थाला ‘गौतम’ या नावानेही ओळखले जाते.
राजपुत्र सिध्दार्थ एक दिवस कपिलवस्तू नगरीत भटकत होता. त्यावेळी त्याला दुःखाचे दर्शन झाले. आजारी माणसाचे दुःख, जर्जर वृद्ध माणसाचे दुःख, अंत्ययात्रेतील दुःख, त्याने जवळून पाहिले. त्याच वेळी त्याने विरक्त संन्याशी देखील पाहिला.
सिध्दार्थ गौतमाला दुःखाची खरी कारणे आणि दुःख निवारणाचा मार्ग शोधण्याचा ध्यास लागला. त्यासाठी त्याने पत्नी,पुत्र, राजवाडा, राजवैभवाचा त्याग केला. केस कापले, राजवस्त्रे त्यागून, संन्यास स्वीकारला, आणि “महाभिनिष्क्रमण”केले.
अवघ्या २९ वर्षांचा संन्यस्त सिध्दार्थ गौतम वेगवेगळ्या गुरूंकडे गेला. तत्वज्ञान, योगविद्या याचे अध्ययन केले. सहावर्षं खडतर तपश्चर्या केली. अन्नत्याग केला.अती तपश्चर्येने शरीर क्षीण झाले. एवढे करूनही संन्यस्त सिध्दार्थ गौतमाला अपेक्षित ज्ञान प्राप्ती नाही. दुःखाची कारणे आणि त्याच्या निवारणाचा मार्ग सापडला नाही. शेवटी त्याने तपश्चर्येचा मार्ग सोडून दिला. ध्यान धारणेचा मध्यममार्ग निवडला.
बिहार राज्यातील बोधगया येथे इ.स.पूर्व ५२८ मध्ये वैशाखी पौर्णिमेच्या दिवशी पिंपळ वृक्षाखाली ध्यानस्थ बसलेला असतांना सिध्दार्थ गौतमाला दिव्यज्ञान प्राप्ती झाली.त्या दिवसापासून सिध्दार्थ गौतम 'बुध्द' झाला, सारे जग तेंव्हा पासून 'बुध्द' म्हणूनच ओळखू लागले. त्यावेळी बुद्धाचे वय अवघे पस्तीस वर्ष होते.
बुध्दाचे सारनाथ येथे पहिले प्रवचन झाले. त्याला 'धम्म चक्र प्रवर्तन' असे म्हणतात. बुध्दाने दुःखाचे वास्तव, दुःखाची कारणे आणि दुःख निवारणाचा मार्ग यावर भाष्य केले. त्याला 'आर्य सत्य' आणि 'अष्टांगमार्ग' म्हणतात. तेथे कौंडिण्य, अश्वजित, वफ्फा, भद्रीक, महानाम हे बुद्धाचे पाच सह तपस्वी उपस्थित होते. बुध्दाचे प्रवचन ऐकून या पाचही जणांनी बौध्द धम्म स्वीकारला, ते बौध्द धम्माचे पहिले पाच भिख्खू झाले. याच वेळी बौध्द संघाची स्थापना झाली.
या धम्मचक्रप्रवर्तन प्रवचनात बुध्दाने सांगितलेले चार आर्यसत्ये पुढील प्रमाणे आहेत.१)दुःख २) दुःख समुदाय ३) दुःख निरोध ४)दुःख निरोध गामिनी प्रतिपद. त्याचा मराठी भावार्थ पुढील प्रमाणे आहे. १) जीवन दु:खमय आहे.२) 'तृष्णा' हे दुःखाचे खरे कारण आहे. ३) तृष्णा संपली की दुःखही संपते ४)अष्टांगमार्ग हा दुःख संपवण्याचा मार्ग आहे.
बुध्दाने सांगितलेला अष्टांगमार्ग पुढील प्रमाणे आहे
१)सम्यक दृष्टि २) सम्यक संकल्प ३) सम्यक वाणी ४)सम्यक कर्म ५) सम्यक आजीविका ६) सम्यक प्रयास ७) सम्यक स्मृती ८) सम्यक समाधी
गौतम बुद्धाने आपल्या अनुयायांना त्रिशरण आणि पंचशील सांगितले. हेच बौद्ध धर्माचे प्राथमिक सूत्र आहेत.
त्रिशरण म्हणजे पाली भाषेत तीन वेळा शपथ घेऊन बौध्द मार्गाशी बांधील होणे,ती शपथ पुढील प्रमाणे आहे.
१. बुद्धं सरणं गच्छामि।
२. धम्मं सरणं गच्छामि।
३. संघं सरणं गच्छामि।
मराठी अर्थ१) मी बुद्धाला शरण जातो. २) मी धम्माला शरण जातो. ३)मी संघाला शरण जातो.
ज्याने बौध्द धम्म स्वीकारला त्याने पाळायचे नैतीक आचार नियम म्हणजे पंचशील. पाली भाषेतील पंचशील असे आहे.
१. पाणातिपाता वेरमणी सिक्खापदं समादियामि।
२. अदिन्नादाना वेरमणी सिक्खापदं समादियामि।
३. कामेसु मिच्छाचार वेरमणी सिक्खापदं समादियामि।
४. मुसावादा वेरमणी सिक्खापदं समादियामि।
५. सुरामेरय मज्जपमादट्ठाना वेरमणी सिक्खापदं समादियामि।
याचा मराठी अर्थ असा आहे.
१. मी कोणत्याही सजीवाचा वध करणार नाही.
२. मी चोरी करणार नाही.
३. मी चुकीचे लैंगिक आचरण करणार नाही.
४. मी खोटे बोलणार नाही.
५. मी मद्यपान किंवा व्यसन करणार नाही.
बुद्ध स्वतः उत्तर भारतात सतत भ्रमंती करत राहिले. त्यांनी राजगृह, वैशाली, श्रावस्ती, कुशीनगर, पाटलिग्राम इ. ठिकाणी प्रवचन दिले. बुध्दाने तपश्चर्या आणि कर्मकांड नाकारले, साधा व समजण्यासारखा मार्ग दाखवला. पाली या लोकांच्या स्थानिक भाषेत उपदेश केला.कौंडिण्य, अश्वजित, वफ्फा, भद्रीक, महानाम या पाच शिष्यांनी विविध प्रदेशात जाऊन बौध्द धम्माचा प्रसार केला.
चार आर्यसत्ये ,अष्टांग मार्ग, त्रिशरण, पंचशील या बरोबरच समानता, करुणा, अहिंसा या मूल्यांमुळे बौध्द धम्म सामान्य लोकांना आपलेसा वाटला. मैत्री आणि प्राणिमात्रांशी दयाभाव यांबाबत बौध्द धम्म आग्रही होता. बौध्द धर्माने यज्ञ, बलिदान, मंत्र यांसारख्या अंधश्रद्धांना विरोध केला. बौध्द धम्म आचारायला सहज आणि सोपा होता. त्यात कोणतेही कर्मकांड नव्हते.
बुध्दाने सर्व जातींच्या लोकांना संघात प्रवेश दिला. बुध्दाने अनुयायांच्या आग्रहाखातर स्त्रियांना देखील संघात प्रवेश दिला. यामुळे समाजातील वंचित वर्ग बौध्द धम्माकडे आकृष्ट झाला. परिणामी संघ वाढत गेला.
मगध, कोशल, काशी, वैशाली यां महाजनपदांतील सामान्य माणूस बौध्द धम्माकडे आत्कृष्ठ झाला. गंगा यमुना खोऱ्यातील मगधचा राजा बिंबिसार त्याचा पुत्र अजातशत्रु, कोशलचा राजा प्रशेनजित, लिच्छवी गणराज्य यांनी बौध्द धम्माला राजाश्रय दिला.या राजाश्रयामुळे बौध्दधम्माला संस्थात्मक स्वरूप मिळाले.
बुद्धांनी अनेक वैज्ञानिक आणि तर्कसंगत विचार मांडले, जे आजही तितकेच महत्त्वाचे आहेत. त्यातील काही प्रमुख मुद्दे -
१)प्रतीत्यसमुत्पाद : बुद्धांनी प्रतीत्यसमुत्पाद ही संकल्पना मांडली, जी कारण आणि परिणाम यांचा संबंध स्पष्ट करते. विज्ञानातही कारण-परिणाम संबंध समजून घेण्यावर भर दिला जातो.
२)अनात्मवाद : बुद्धांनी अनात्मवादाची संकल्पना मांडली, जी आत्म्याच्या संकल्पनेला नाकारते. विज्ञानही आत्म्याच्या संकल्पनेला एक मिथक मानते.
३)ध्यान आणि मानसिक आरोग्य : बुद्धांनी ध्यान आणि मानसिक आरोग्य यावर भर दिला. ध्यानाच्या साहाय्याने मानसिक स्वास्थ्य सुधारता येते, हे वैज्ञानिक संशोधनानेही सिद्ध केले आहे.
४)करुणा आणि सहानुभूती : बुद्धांनी करुणा व सहानुभूती यांना महत्त्व दिले. विज्ञानसुद्धा सामाजिक संबंध आणि सहानुभूती यांचे महत्त्व अधोरेखित करते.
५)तर्कसंगतता आणि अनुभववाद : बुद्धांनी तर्कसंगतता आणि अनुभव यावर भर दिला. त्यांनी सांगितले की कोणतीही गोष्ट विचार न करता स्वीकारू नये, तर तर्क व अनुभव यांच्या आधारे निर्णय घ्यावेत.
गौतम बुद्धांचे विचार विज्ञान सुसंगत आहेत म्हणूनच बुद्धांचे विचार आजही कालसुसंगत आहेत.सारिपुत्र, मोग्गलायन, आनंद, महाकश्यप, उपाळी हे बुध्दाचे प्रमुख शिष्य होते.बुद्धाने आपल्या शिष्यांना धम्मदूत विविध दिशांना धम्म प्रसारासाठी पाठवले.
सारनाथच्या धर्मचक्र प्रवर्तनापासून कुशीनगरातील महापरिनिर्वाणापर्यंत सुमारे ४५ वर्षे बुद्धाने गंगेच्या मैदानात व्यापक भ्रमंती करून धम्माचा प्रसार केला. त्यांच्या साध्या शिकवणीमुळे लोकांचा प्रचंड जनाधार मिळाला. राजे, श्रीमंत व्यापारी, गणराज्ये यांनी आश्रय व दान दिल्याने संघ वाढत गेला. त्यामुळे बौद्ध धर्म सामाजिक-धार्मिक चळवळ बनला.
संघटित भिक्षु संघ आणि भिक्षुणी संघ तयार झाल्याने बौध्द धम्माचा प्रचार अधिक वेगाने झाला.गौतम बुद्धाच्या हयातीत राजगृह, पाटलिपुत्र, श्रावस्ती,सारनाथ,राजगृह, पाटलीपुत्र, लिच्छवी,कपिलवस्तू, कुशीनगर, कौशाम्बी, पाटलीग्राम, पावापुरी ,नेपाळ, वायव्य हिमालय आदी भागात बौध्द धम्माचा प्रसार झाला होता.
थेरवाद परंपरेनुसार इ.स.पूर्व ४८३ मध्ये उत्तरप्रदेशातील कुशीनगर येथे बुद्ध महापरिनिर्वाणाच्या वाटेवर होते. त्या वेळी त्यांचा शिष्य आनंद खूप दुःखी झाला. रडू लागला.बुद्ध म्हणाले
"आनंदा, तू शोक करू नकोस. प्रत्येक गोष्ट क्षणभंगुर आहे. जी उत्पन्न झाली आहे ती नष्ट होणारच.”
“मी नेहमी सांगत आलो आहे की माझ्या शरीरालाही हा अनित्यतेचा नियम लागू आहे.”
“तुला दुःखी व्हायचे कारण नाही. तू माझा निष्ठावंत सेवक आणि शिष्य होतास.”
“आनंद, रडू नकोस. मी तुम्हाला वारंवार सांगितले आहे , सर्व गोष्टी नश्वर आहेत. ‘अत्त दीप भव’ स्वतःचा दीप स्वतः बना.” स्वतःच स्वतःचा आधार बना.
यांवेळी भिख्खू देखील मोठ्या संख्येने जमा झाले. त्या सर्वांना उद्देशून बुद्ध म्हणाले “वयधम्मा संखारा, अप्पमादेन संपादेथ.” सर्व गोष्टी नश्वर आहेत. म्हणूनच जागरूकतेने, सतर्कतेने आपले जीवन जगावे, आत्मकल्याणासाठी प्रयत्न करावेत हा बुद्धाचा अंतिम उपदेश होता. याला 'महापरिनिर्वाण सुत्त' म्हणतात. महापरिनिर्वाण सुत्त हा केवळ बुद्धाच्या मृत्यूचा वृत्तांत नाही, तर त्यांच्या तत्त्वज्ञानाचा शेवटचा आणि सर्वाधिक प्रभावी उपदेश आहे.यातून आपल्याला नश्वरता,सजगता, आत्मप्रयत्न, आणि स्वतःचा आधार स्वतः बनणे हा अमूल्य धडा मिळतो.
थेरवाद परंपरेनुसार इ.स.पूर्व ४८३ मध्ये कुशीनगरला शालवृक्षांच्या सावलीत बुद्धाचे महापरिनिर्वाण झाले. कुशीनगर हे मल्ल गणराज्य होते. मल्लांनी गौतम बुध्दाचे राजासमान सन्मानाने अंत्यसंस्कार केला. बुद्धाच्या निधनानंतर त्यांचे अवशेष आठ गणराज्यांनी वाटून घेतले. बुध्दाची धातूंची भांडी (कलश) व अग्निसंस्कारातील राख दोन राजांनी घेतली. या अवशेषांवर एकूण दहा ठिकाणी सुरुवातीला दहा स्तूप बांधले गेले.
इ.स.पूर्व ३रे शतकात सम्राट अशोकाने भारत व भारताबाहेर श्रीलंका, नेपाळ, अफगाणिस्तान, म्यानमार यां देशात बुद्धधर्माचा व्यापक प्रसार केला. सम्राट अशोकाने बुध्दाचे अवशेष असलेले दहा स्तूप उघडून त्यातील अवशेष बाहेर काढले व पुन्हा वाटून दिले. त्याने भारत व भारताबाहेर श्रीलंका, नेपाळ,म्यानमार, अफगाणिस्तान आदी देशात हजारो स्तूप बांधले.
थेरवाद परंपरेनुसार इ.स.पू. ४८३ मध्ये बुद्धाच्या निर्वाणानंतर लगेच, साधारण तीन महिन्यांनी पहिली संगती (First Buddhist Council) सप्तपर्ण गुहा,राजगृह, बिहार येथे झाली. हि संगती राजा अजातशत्रु याच्या संरक्षणाखाली स्थविर महाकाश्यप यांनी आयोजित केली. यात बुद्धाचे उपदेश व्यवस्थित जतन करण्यासाठी आनंदाने सुत्त पिटकाचे पठण केले.तर उपालीने विनय पिटकाचे पठण केले.या संगतीत धम्म-शिस्त यांचे संकलन करण्यावर भर देण्यात आला.
बुद्ध निर्वाणानंतर १०० वर्षांनी इ.स.पूर्व ३८३ मध्ये वैशाली येथे दुसरी संगती Second buddhist council झाली. यात कठोर भिक्षुव्रत पाळावे की थोडी शिथिलता ठेवावी या वरून मतभेद झाले. यामुळे बौद्ध संघ दोन गटांत विभागला. स्थविरवादी (Theravāda/हीनयान) गटाने कडक नियमांचे पालन करण्याचा आग्रह धरला तर (Mahāsāṃghika) महासांघिक गटाने अधिक उदार नियम, लोकाभिमुख दृष्टिकोन यांचे समर्थन केले. या दुसरी संगतीत झालेले मतभेद हेच पुढे हीनयान–महायान पंथाच्या निर्मितीचे कारण ठरले.
इ.स.पू. २५० मध्ये तिसरी संगती Third Buddhist Council पाटलीपुत्र येथे सम्राट अशोक यांच्या पुढाकाराने झाली. मोग्गलिपुत्त तिस्स याने या संगतीचे नेतृत्व केले. या संगतीत संघाच्या शुद्धतेवर भर देण्यात आला. वेगवेगळ्या उपसंप्रदायांची ओळख स्पष्ट झाली.
याच काळात अशोकाने धम्मप्रसारासाठी श्रीलंका, काश्मीर, गांधार, ग्रीक इ.देशात बौध्दभिख्खू धम्मदूत म्हणून पाठवले. त्यांनी सेवाभावी वृत्तीने लोकांना आपलेसे करून बौध्द धम्माचा प्रसार केला. अशोकाने धम्मलेखांद्वारे बौद्धधम्माची तत्त्वे लोकांपर्यंत पोहोचवली.
इ.स.१ल्या शतकात, कनिष्काच्या काळात चौथी संगती Fourth Buddhist Council झाली, जिथून महायान तत्त्वज्ञान अधिक प्रबळ झाले.गौतम बुद्धांच्या काळात बौद्ध धर्म एकसंध होता. परंतु बुद्धांच्या निर्वाणानंतर त्यांच्या उपदेशाचे अर्थ लावण्यात, आचरणात आणि धम्मग्रंथांच्या व्याख्येत मतभेद निर्माण झाले. यामुळे पुढे काळाच्या ओघात बौध्द धम्मात हीनयान(थेरवाद), महायान आणि वज्रयान असे पंथ निर्माण झाले.
हीनयान पंथ थेरवाद म्हणूनही ओळखला जातो.
बुद्धाच्या निर्वाणानंतर साधारण इ.स.पूर्व ३ऱ्या शतकात याचा पाया घट्ट झाला. बुद्धाचे मूळ उपदेश जसेच्या तसे जपावेत, कठोर भिक्षुजीवन व व्यक्तिगत मोक्षाला प्राधान्य द्यावे अशी हीनयान पंथाची धारणा होती. हीनयान (थेरवाद) हा बौद्ध धर्मातील सर्वात जुना व पारंपरिक पंथ आहे.तपश्चर्या, संयम, कठोर भिक्षुव्रत हि या पंथाची ओळख आहे. "स्वतःचा मोक्ष"हे या पंथाचे मुख्य वैशिष्ट्य होते. श्रीलंका, म्यानमार, थायलंड, कंबोडिया, लाओस आदी देशात थेरवाद म्हणजेच हीनयान पंथ प्रभावी आहे.
महायान (Mahayana) पंथ साधारणपणे इ.स.पूर्व पहिल्या शतकात उदयाला आला. महायान पंथीय बुद्धाला केवळ ऐतिहासिक मानव न मानता "बोधिसत्त्व" व "लोकहितकारी बुद्धत्व" मानतात. धम्माचा लोकसुलभ प्रचार,सर्वांचा मोक्ष, करुणा व बोधिसत्त्व मार्ग हे महायान पंथाचे वैशिष्ट्य आहे. ते बुद्धाला दैवी दर्जा देतात. अनेक बुद्ध व बोधिसत्त्वांची उपासना करतात. या पंथाचे लोक प्रामुख्याने भारत, चीन, कोरिया, जपान, मंगोलिया, व्हिएतनाम, नेपाळ, तिबेट इ. देशात राहतात.
इ.स. ७ व्या–८ व्या शतकात वज्रयान हा पंथ उदयाला आला, हा पंथ तांत्रिक बुध्दिझम या नावाने देखील ओळखला जातो.हा पंथ महायानाच्या तत्त्वांवर आधारित आहे पण तंत्र-मंत्र, योग, साधना या गोष्टींचा प्रभाव या पंथावर आहे. मंत्र, मंडल, साधना, देवतांची उपासना, तांत्रिक व योगिक पद्धतींनी त्वरित मोक्षप्राप्ती मिळते असा यांचा विश्वास आहे. वज्रयान पंथ तिबेट, नेपाळ, भूतान, मंगोलिया या देशात विशेषत्वाने पसरला आहे.
आजही भारताबाहेर चीन, श्रीलंका, म्यानमार, कंबोडिया, मंगोलिया, तिबेट, लाओस, थायलंड, जपान, कोरिया, आदी देशात बौध्द धर्माचे लोक बहुसंख्येने राहतात.
भारतात मात्र आठव्या नवव्या शतकात बौद्ध धर्माचा ऱ्हास सुरु झाला. बौध्द भिख्खू मूळ बौध्द धम्मापासून भरकटले. हा धर्म सामान्य लोकांपासून दूर गेला .महायान पंथातील गुंतागुंतीचे तत्त्वज्ञान, वज्रयान पंथात तंत्र, मंत्र, जादू, टोना याचे वाढलेले प्राबल्य, सर्वच पंथात वाढलेले कर्मकांड यांमुळे बौद्ध धर्मातील मूळचा साधेपणा आणि विज्ञान सुसंगतता हरवली. काही इतिहासकारांच्या मते शुंग वंशाचा राजा पुष्यमित्र शुंग याने बौध्द धर्माच्या विरोधात मोहीम राबवली, त्याने बौध्द मठ आणि स्तूप पडून टाकले.बौध्द भिख्खूंचा छळ केला . हून आणि इस्लामी आक्रमण सुरु झाले त्यांनी देखील बौध्द मठ आणि स्तूप पाडून टाकले. यां सर्व कारणांमुळे भारतातील बौद्ध धर्म जवळपास संपुष्टात आला होता.
विसाव्या शतकात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक समतेचा आग्रह धरणारी चळवळ सुरू झाली. त्यांनी अस्पृश्य समाज संघटित केला. अस्पृश्यता नष्ट करण्या बरोबरच अस्पृश्यांना शिक्षण, नोकरी, राजसत्ता यात लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षणाची मागणी केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २० मार्च १९२७ रोजी महाडला चवदार तळ्याचा सत्याग्रह केला. हजारो अस्पृश्यांनी स्वतःच्या ओंजळीने पाणी पिण्याचा हक्क बजावला. यांपुढे सार्वजनिक पाणवठ्यावर स्पृश्य अस्पृश्य असा भेदभाव चालणार नाही असा इशारा देण्यात आला.
मनुस्मृती या ग्रंथात स्त्री शुद्रादींना मानवीय अधिकार नाकारले गेले आहेत, विषमतेचे प्रतीक समजल्या जाणाऱ्या मनुस्मृती या ग्रंथाचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे २५ डिसेंबर १९२७ रोजी जाहीर दहन केले.
१९३० ते १९३५ सलग पाच वर्षे नाशिकच्या काळाराम मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा यांसाठी काळा राम प्रवेश सत्याग्रह केला. सलग पाच वर्ष सत्याग्रह करूनही स्पृश्य मंडळींनी अस्पृश्यांना काळा राम मंदिरात प्रवेश करण्यास उघड विरोध केला.
या सर्व घटनांमुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर व्यथित झाले त्यांनी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी येवला जिल्हा नाशिक येथील एका भव्य सभेत "मी हिंदू म्हणून जन्मलो, हे माझ्या हातात नव्हते; पण हिंदू म्हणून मरणार नाही, हे मात्र माझ्या हातात आहे." अशी ऐतिहासिक घोषणा केली. या घोषणेमुळे अस्पृश्य समाजात आत्मभान निर्माण झाले. अस्पृश्यतेच्या अमानवीय प्रथे विरोधात दलित समाज जागृत झाला. समान अधिकारासाठी संघर्ष करण्यास तो सज्ज झाला.
या घोषणेने देशभर खळबळ माजली. सनातनी मंडळींनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर विखारी टीका करून त्यांना लक्ष्य करणे सुरू केले तर काँग्रेसने हरिजानोद्धार कार्यक्रम हाती घेतला.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू स्पृश समाजाच्या धार्मिक नेत्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा केली, वीस वर्षे वाट पाहिली पण त्यांचा अपेक्षाभंग झाला, त्यामुळे व्यथित होऊन त्यांनी धर्मांतराचा निर्णय घेतला.
१४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूरच्या दीक्षा भूमीवर आपल्या लाखो अनुयायांसह डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्माचा त्याग करून बौध्द धर्माची दिक्षा घेतली. एकाचवेळी लाखों लोकांनी धर्मांतर करण्याची जगातील असाधारण घटना होती. संपूर्ण जगात याचे पडसाद उमटले.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपाठोपाठ देशभरात असंख्य ठिकाणी धर्मांतराचे कार्यक्रम झाले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर व त्यांचे करोडो अनुयायांनी बौध्द धर्म स्वीकारल्यामुळे भारतात बौध्द धर्माचे पुनरुज्जीवन झाले.
बौध्द धर्मातील हीनयान (थेरवाद), महायान,वज्रयान या तिन्ही पंथांना नकार देऊन बाबासाहेबांनी नवयान या नव्या मार्गाची घोषणा केली. त्यांनी बुध्द आणि त्याचा धम्म हा ग्रंथ लिहिला.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धांची चार आर्यसत्ये आध्यात्मिक चौकटीतून बाहेर काढून सामाजिक चौकटीत आणली. दुःख हे समाजातील शोषण आहे, दुःखाचे कारण जातिव्यवस्था व विषमता आहे. सामाजिक क्रांती करून दुःखाचे निरसन करता येते त्यासाठी समता, बंधुता, न्याय युक्त लोकशाही जीवन हा मार्ग अवलंबला पाहिजे.असा चार आर्य सत्याचा व्यापक भावार्थ सांगितला.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व प्रकारचे कर्मकांड नाकारून विज्ञान सुसंगत बौध्द धर्म सांगितला. आपल्या अनुयायांना त्यांनी बावीस प्रतिज्ञा अंगिकरायला सांगीतल्या.
बौध्द म्हणजे त्रिशरण, पंचशील आणि बावीस प्रतिज्ञा यांचे पालन करणारा इतका साधा सोपा अर्थ बाबासाहेबांनी सांगितला. दुर्दैवाने बाबासाहेबांना धर्मांतर घोषणेनंतर फार थोड्या दिवसांचे आयुष्य मिळाले.
६ डिसेंबर १९५६ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले. त्यांच्या पश्चात त्यांचे कोट्यवधी अनुयायी "प्रज्ञा शील करुणा" यांचा अंगीकार करीत बौध्द म्हणून स्वाभिमानाने जगत आहेत." शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा" या संदेशाचा अवलंब आपल्या जीवनात करीत आहेत.
आज जगात जवळपास त्रेपन्न कोटी लोकसंख्या बौध्द धर्माची आहे. जगातील लोकसंख्येपैकी चवथ्या क्रमांकाची लोकसंख्या बौध्द धर्माची आहे.
जगात शांतता आणि सलोखा राहण्यासाठी बुध्दाने सांगितलेल्या पंचशीलातील सत्य,अहिंसा,अचौर्य, शुध्द चारित्र्य आणि व्यसनमुक्त जीवन हा विचार आजही मार्गदर्शन आणि महत्वाचा आहे.
‘अत्त दीप भव’ हा बुध्दाने दिलेला संदेश महत्वाचा आहे. 'स्वतःचा दीप स्वतःच बना,स्वतःचा आधार स्वतःच व्हा' या बुद्धाच्या मार्गाने मार्गक्रमण केल्यास आपले जीवन हमखास यशस्वी होईल असा विश्वास गौतम बुध्दाने दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही याच मार्गाने आपल्या जीवनाचा उध्दार करून घ्या असा संदेश दिला.
- हिरालाल पगडाल, संगमनेर
९८५०१३०६२१
