नाशिक दिनकर गायकवाड महापालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाच्यावतीने पाथर्डी गावातील गौळाणे रोड येथील कब्रस्तान परिसरात सुरू असलेल्या अनधिकृ त बांधकामावर महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्या आदेशानुसार व अतिक्रमण उपायुक्त सुवर्णा दखणे यांच्या निर्देशानुसार अतिक्रमण हटविण्यात आले.
या मोहिमेदरम्यान मनपा अतिक्रमण पथकाचे कर्मचारी आणि कब्रस्थान कमेटीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली.यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख आणि इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ महिला पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवल्यामुळे पुढील अनर्थ टळला.
पाथर्डी गावानजीक कब्रस्थान आहे. या कब्रस्थानचा वापर केवळ पाथर्डी गावातील मुस्लीम धर्मीयासाठी न होता याचा वापर पाथर्डी गावासह देवळाली कॅम्प, नाशिकरोड, सातपूर, सिडको यासह नाशिक शहरातील मुस्लीम धर्मिय करत असल्याचा वापर स्थानिक नागरिकांनी करून या कब्रस्थानमध्ये अतिक्रमण करून शुक्रवारची नमाज अदा करण्यासाठी मोठी गर्दी होत असते.
तसेच याच जागेचा मदरसा म्हणून देखील वापर केला जात आहे. त्याचप्रमाणे या कब्रस्थान कमेटीने या जागेवर वक्फ बोर्डाकडे नोंद करून स्थानिक ग्रामस्थांचा विश्वासघात केल्याचाही आरोप केला आहे.
एकूणच या सर्व प्रकारामुळे पाथर्डी ग्रामस्थांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून हे बांधकाम अनधिकृत स्वरूपाचे असल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांकडून वारंवार प्राप्त होत होत्या. यावर महापालिके ने तपासणी करून संबंधित जागेवर
होणारे बांधकाम नियमबाह्य असल्याचे निष्पन्न केले. त्यानंतर नियोजितपणे कारवाईचे आदेश देण्यात आले.
महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने हे बांधकाम पाडण्याची कार्यवाही शांततेत पार पाडली. कारवाईपूर्वी संबंधितांना नोटीसा देण्यात आल्या होत्या. तसेच कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच अंमलबजावणी करण्यात आली. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार या जागेचा मूळ उद्देश फक्त दफनभूमीचा होता. मात्र त्यावरील बदलामुळे सामाजिक व वाहतूक संदर्भातील अडचणी निर्माण होत
होत्या. या कारवाईदरम्यान नवीन नाशिक विभागीय अधिकारी जयश्री बैरागी यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाचे प्रमुख निखिल तेजाळे यांच्यासह अधिकारी मेहुल दवे, निवृत्ती कापडणे, रवींद्र काथोटे आणि वाहन चालक सुनील हिरे यांनी सक्रिय सहभाग घेतला. यासोबतच कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या वतीने मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
महापालिकेच्या या कारवाईमुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण असून, प्रशासनाने नागरिकांच्या
तक्रारींची गंभीर दखल घेतली आहे. हा प्रकार पुन्हा उद्भवू नये, यासाठी महापालिका अधिक सतर्क राहणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.
