नवी दिल्ली सिटीलाईन मिडिया नेटवर्क सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी जनता दरबार हे खुले राजकीय व्यासपीठ बनवताना दिसत आहे नुकतेच दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर जनता दरबारात हल्ला करण्यात आला.त्यांच्या सरकारी बंगल्यावर जनता दरबार सुरू असताना ही घटना घडली.
पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली असून, त्याची चौकशी सुरू आहे. हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.मिळालेल्या माहितीनुसार,मुख्यमंत्री जयते रेखा गुप्ता यांच्या सरकारी निवासस्थानी आज जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते.
त्यासाठी अनेक नागरिक तक्रार आणि समस्या घेऊन दाखल झाले होते. तेव्हा हल्लेखोर सुद्धा तक्रार देण्यासाठी जनता दरबारात हजर झाला. रेखा गुप्ता जनता दरबारात होत्या. त्यावेळी संबंधित व्यक्तीने एक निवेदन मुख्यमंत्र्यांकडे दिले. मात्र, हा व्यक्ती अचानक आक्रमक झाला.
त्याने रेखा गुप्ता यांना शिवीगाळ करत त्यांच्या कानशिलात लगावली. या व्यक्तीने अनेकदा रेखा गुप्ता यांच्या कानाखाली मारल्या. त्यांचे केस पकडून त्यांना मारहाण केल्याचे वृत्त आहे.
पोलिसांकडून या व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली जात आहे. हा व्यक्ती नेमका कोण आहे, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, संबंधित व्यक्ती नैराश्यात गेलेल्या एका राजकीय पक्षाशी संबंधित असल्याचे सूचक वक्तव्य दिल्ली भाजपचे प्रवक्ते प्रवीण कपूर यांनी केले.त्यामुळे आता पोलिसांच्या तपासातून काय माहिती समोर येणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
