लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती दिनी त्यांच्या साहित्य खंड ५,६ आणि ७ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन
पुणे सिटीलाईन न्यूज नेटवर्क साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे संघर्षमय जीवन, त्यांचे महान कार्य,अजरामर साहित्य जगासमोर येण्याकरिता त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रदर्शित करण्यात येईल, याकरीता निधी कमी पडू देणार नाही,असे आश्वासित करुन अण्णा भाऊ साठे यांनी दाखविलेल्या मार्गावर राज्य शासन मार्गक्रमण करेल,अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे येथे दिली.
उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यखंड क्रमांक ५, ६ आणि ७ च्या साहित्य प्रकाशन समारंभात ते बोलत होते.
अण्णाभाऊंच्या संघर्षमय जीवनातून त्यांचे व्यक्तीमत्व मोठे झाले.त्यांच्या लेखणीतून समाजाला दिशा,प्रेरणा, सामान्य माणसाला बळ,वंचिताचा आवाज देण्याचे कार्य केले.त्यांचे हे कार्य समाजासमोर आणण्याचे काम सुरू आहे. समाजाची मूलतत्त्वे सांगणारे, संवेदना जीवंत ठेवणारे अशाप्रकारचे अजरामर साहित्य पुढच्या प्रत्येक पिढीपर्यंत पोहोचले पाहिजे, यादृष्टीने संशोधन झाले पाहिजे. साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकाकरिता २५ कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात आले आहेत, स्मारकाचे आराखडेही तयार झाले आहेत, येत्या काळात लवकरात स्मारक पूर्ण करण्यात येईल, याकरिता राज्य शासन सहकार्य करेल, असेही श्री. फडणवीस म्हणाले.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, नगर विकास राज्य मंत्री माधुरी मिसाळ,आमदार अमित गोरखे, विजय शिवातारे,सुनील कांबळे, हेमंत रासणे,उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव वेणु गोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर उपस्थित होते.
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मृतींना अभिवादन करुन एकनाथ शिंदे म्हणाले, अण्णा भाऊ हे साहित्यिक, शाहिर, लढाऊ व्यक्तीमत्व, प्रस्थापित मराठी साहित्य, संस्कृती, परंपरा नाकारणारे पहिले दलित बंडखोर लेखक होते. त्यांचे साहित्य प्रबोधन व परिवर्तनवादी होते. त्यांनी साहित्यातून समाजातील वंचित, दीनदलित, कष्टकरी, स्त्रिया, भटके यांच्या व्यथा आणि वेदना मांडण्याचे काम केले. त्यांच्या कथा कांदबऱ्यांमध्ये कामगारांचा श्रमाचा पुरस्कार, जमीनदारांचा शोषणांचा धिक्कार होता. अण्णाभाऊच्या जयंतीचे औचित्य साधून कथा, लोकनाट्य, नाटक, शाहिरी, प्रवासवर्णनांचा खंड वाचकासमोर येत असून ही मराठी क्षेत्रातील अतिशय महत्वाची घटना आहे.