मालेगाव प्रतिनिधी नुकतेच शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन मोठ्या उत्साहात झाले. विधिवत पूजाअर्चना करून बाप्पाला विराजमान करण्यात आले.
या प्रसंगी शिक्षणमंत्री भुसे यांनी "राज्यातील सर्व नागरिकांना, शालेय विद्यार्थी-शिक्षकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या." “गणरायाची कृपा संपूर्ण राज्यावर होवो,बळीराजा सुखी-समृद्ध होवो आणि सर्वांना निरोगी, आनंददायी आयुष्य लाभो” अशी प्रार्थना त्यांनी केली."
यावेळी निवासस्थानी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेवर आधारित विशेष थीमद्वारे सजावट करण्यात आली होती. सजावटीत शाळा,शालेय विद्यार्थी,पाठ्यपुस्तक,बळीराजा तसेच देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांच्या प्रतिकृतींचाही समावेश करण्यात आला आहे.
शिक्षण मंत्र्यांनी गणपती बाप्पाला यावेळी साकडे घालताना सांगितले की, “गरिबातल्या गरीब विद्यार्थ्यालाही गुणवत्तापूर्ण व आनंददायी शिक्षण मिळवून देण्यासाठी बळ मिळावे.”
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शालेय शिक्षण विभागाची जबाबदारी आपल्या मालेगाववर सोपवली आहे.त्यानुसार जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण मिळाले पाहिजे आणि राष्ट्रप्रेमाची भावना जोपासली गेली पाहिजे.आपल्या शिक्षण विभागाची थीम ‘राष्ट्र प्रथम’ आहे.हाच संदेश आमच्या कुटुंबाने या सजावटीतून दिला आहे.येणाऱ्या काळात देशभक्त व राष्ट्रप्रेमी नागरिक घडविणे हेच आमचे ध्येय आहे असे त्यांनी स्पष्ट केले.
