नाशिक दिनकर गायकवाड मखमलाबाद गावाजवळील तवलीच्या डोंगरावर नागोबा यात्रेनिमित्त मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. याच गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी यात्रेत आलेल्या चार महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या लांबविल्या. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक - तपास पोलिस करीत आहेत.
याबाबत अधिक वृत्त असे की, मखमलाबाद गावाजवळील तवली डोंगरावर नाग देवतेचे मंदिर आहे. नागपंचमी निमित्त या ठिकाणी दरवर्षी यात्रोत्सव साजरा केला जातो. यासाठी पंचक्रोशीतून मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनासाठी - येतात. दिवसेंदिवस मखमलाबाद येथील यात्रेत भाविकांच्या गर्दीत वाढ होत आहे. मात्र, याच गर्दीचा फायदा चोरटे घेत आहे. मखमलाबाद शिवारातील चार ते पाच महिला दर्शनासाठी या नागोबा मंदिरात दर्शन घेऊन त्या परतत असताना यात्रा मार्गावर त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरट्यांनी लांबविल्या. सोनसाखळी लांबविल्याचे लक्षात येताच या चार महिलांनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत.
नागोबा देवतेच्या मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. याच गर्दीचा फायदा घेत चोरी झाली आहे. लवकरात लवकर तपास करून चोरांच्या मुसक्या आवळण्यात येतील. सध्या गुन्हे शोध पथक हे चोरांचा माग काढत आहे, अशी माहिती म्हसरूळचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण यांनी दिली.