नाशिक दिनकर गायकवाड भारतीय संरक्षण दलाच्या ओझरस्थित डीआरडीओच्या 'एसीएम' युनिटने शुक्रवारी (दि. १२) दुपारी आयोजित केलेली रॉकेट परीक्षण चाचणी निर्धारित वेळेपेक्षा सायंकाळी उशिरा पार पडली.दरम्यान, चाचणीमुळे निफाड तालुक्यातील ओझरसह दिंडोरीतील जऊळके वणी आणि आडगाव तसेच पंचवटी येथे धडकी भरविणारा आवाज झाल्याने काही काळ घबराट पसरली होती. यंत्रणेने काहीसा खुलासा केल्यावर या रहस्यमयी आवाजाचे गूढ उकलण्यास मदत झाली.
अर्थात डिफेन्स रिसर्च अँन्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन डीआरडीओच्या अंतर्गत असलेल्या 'एसीईएम' युनिटने स्थिर रॉकेट मोटर परीक्षण (दि. १२) दुपारी योजिले होते. मात्र, तांत्रिक अडचणींसह वातावरणीय बदलामुळे ही चाचणी व परीक्षण सायंकाळी उशिरा झाल्याचे समजते.
परीक्षण नियोजित वेळेत असताना व युनिटने संबंधित ग्रामपंचायतीसह इतर ठिकाणी चाचणीची पूर्वसूचना दिली असताना ती निर्धारित वेळेत न झाल्याने अचानक १८० डेसीबलपर्यंतचा धडकी भरविणारा आवाज झाल्याने ग्रामस्थ व आजूबाजूचे नागरिक काही काळ दहशतीखाली आले होते. विशेष म्हणजे केवळ ७० सेकंदापर्यंतच आखलेल्या या चाचणीचे निष्कर्ष व अन्य माहितीचे संकलन युनिटने केल्याचे समजते. याबाबत अधिक माहितीसाठी डीआरडीओच्या दूरध्वनीवर संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
