नाशिक दिनकर गायकवाड तब्बल साडेतीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी आरक्षण जाहीर झाले असून, हे पद सर्वसाधारण (खुल्या) गटातील उमेदवारांसाठी ठेवण्यात आले आहे. ग्रामविकास विभागाने ९ सप्टेंबर रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी आरक्षण सोडत जाहीर केली.
राजकीय पक्षांतील इच्छुक नाशिकसाठी हे पद खुल्या प्रवर्गात आल्याने विविध नेत्यांमध्ये जोरदार स्पर्धा रंगण्याची शक्यता आहे. राजकीय वर्तुळात या आरक्षणाने चर्चांना उधाण आले असून, निवडणुकीसाठी पक्षांतर्फे उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे. त्यामुळे गटातून निवडून येण्यासाठी तयारीला जोर येणार आहे.
जिल्ह्यात एकूण ७४ गट आणि १४६ गण आहेत. चक्रीय आरक्षण पद्धतीला ब्रेक देऊन नव्याने आरक्षण जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला.यामुळे सर्वाधिक
लोकसंख्या असलेल्या प्रवर्गासाठी गट राखीव होण्याचा मार्ग मोकळा झाला. मात्र, या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकांमुळे निवडणुकीची प्रक्रिया अजूनही प्रलंबित आहे. न्यायालयाचा अंतिम निर्णय झाल्यानंतरच निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल.
२०२२ मध्ये महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या आरक्षणानुसारच विद्यमान महायुती सरकारने नव्याने सोडत काढली आहे.नाशिकसाठी सर्वसाधारण गटातील पदामुळे पक्षीय नेत्यांमध्ये उत्साह वाढणार आहे. अधिकाधिक सदस्य निवडून आणण्यासाठी आतापासूनच तयारी सुरू होईल. मागील काळात सर्वसाधारण प्रवर्गातून मविप्र संस्थेचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर अध्यक्ष राहिले आहेत. त्यांच्या आधी सिन्नरच्या शीतल सांगळे (ओबीसी महिला) आणि विजयश्री चुंबळे (सर्वसाधारण महिला) यांनी हे पद भूषवले होते.
पंचायत समित्यांमध्ये महिला राज
ग्रामविकास विभागाने पंचायत समिती सभापतींचे आरक्षणही जाहीर केले आहे. जिल्ह्यातील पंचायत समित्यांसाठी (निश्चित नसले तरी) असे आरक्षण आहे प्रवर्ग जागा अनुक्रमे अनुसूचित जमाती (एसटी) - २, अनुसूचित जमाती महिला २, अनुसूचित जाती (एससी) महिला १, ओबीसी १, ओबीसी महिला १, सर्वसाधारण ३, सर्वसाधारण महिला ४, एकूण किमान ८ महिला सभापती निवडले जातील. यामुळे पंचायत समित्यांमध्ये महिलांचे वर्चस्व दिसेल. हे आरक्षण लोकसंख्येनुसार आणि लिंग समानतेच्या तत्त्वावर घेण्यात आले आहे.
इतर जिल्हा परिषद आरक्षण
सर्वसाधारण : नाशिक, जळगाव, पुणे, रायगड, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, यवतमाळ सर्वसाधारण महिला: ठाणे, सांगली, कोल्हापूर, धाराशिव, लातूर, अमरावती, गोंदिया, गडचिरोली
इतर मागास प्रवर्ग : सोलापूर, हिंगोली, नागपूर, भंडारा
इतर मागास प्रवर्ग महिला : रत्नागिरी, धुळे, सातारा, जालना, नांदेड
अनुसूचित जाती : परभणी, वर्धा
अनुसूचित जाती महिला : बीड, चंद्रपूर
अनुसूचित जमाती : पालघर, नंदूरबार
अनुसूचित जमाती महिला : अहिल्यानगर, अकोला, वाशीम
