नाशिक दिनकर गायकवाड वेल्डिंग गॅस टाकीचा स्फोट होऊन एका इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना जुन्या बस डेपोजवळ घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की पंचवटीतील जुन्या बस डेपोच्या भिंतीलगत रवींद्र वसंतराव पाटणकर (वय ६२, रा. म्हसरूळ, नाशिक) यांचा गॅस वेल्डिंगचा व्यवसाय आहे. दि. ३० ऑगस्ट रोजी दुपारी पावणेदोन वाजेच्या सुमारास पाटणकर हे एका मारुती अल्टो कार गाडीच्या चाकाचे ढिले झालेले नट गॅस कटरच्या सहाय्याने तोडत होते.
त्यावेळी त्यांनी अयोग्य रीतीने हाताळणी केल्याने गॅस टाकीचा स्फोट झाला. या घटनेत नंबर प्लेटच्या कामकाजासाठी तेथे आलेले रामनाथ बाळकृष्ण सोमवंशी (वय ४९, रा. छत्रपती संभाजीनगर रोड, नाशिक) हे आलेले होते. या दुर्घटनेत ते गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलीस हवालदार संदीप गांगुर्डे यांच्या फिर्यादीवरून रवींद्र पाटणकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रकाश नेमाणे करीत आहेत.