मांचीहिल शैक्षणिक संकुलात प्रबोधनकार वसंत हंकारे यांचे प्रेरणादायी व्याख्यान
आश्वी संजय गायकवाड मांचीहिल शैक्षणिक संकुलामध्ये विद्यार्थी व्यक्तिमत्त्व विकास योजने अंतर्गत आयोजित केलेल्या व्याख्यान मालेत प्रसिद्ध लेखक समाज प्रबोधनकार, आणि युवा प्रेरक वसंत हंकारे यांचे “बाप आणि मुलं” या विषयावरचे व्याख्यान अतिशय उत्साही वातावरणात यशस्वीपणे पार पडले.
बापाच्या त्यागाची जाणीव करून देणाऱ्या विचारांची उधळण त्यांनी आपल्या शैलीत मांडताना तरुणाईचा उत्साह ओसंडून वाहत होता.डोळ्यातुन न दाखवता जो प्रेम करतो त्याला बाप म्हणतात कारण बापाच्या हृदयात लाजाळूच्या संवेदना असतात आपल्या नेहमी सारख्या हृदयाला भिडणाऱ्या शब्दांत व्याख्याते हंकारे यांनी सांगितले की “आईच्या मायेबद्दल आपण रोज बोलतो,तिच्या त्यागाची जाणीव आपल्याला लहानपणापासून होते.
पण बाप हा आयुष्यभर थकून-भागूनही कुटुंबासाठी सावली देणारा निःशब्द पर्वत आहे.त्याची कदर बहुतेक वेळा आपल्याला उशिरा होते.त्याच्या आयुष्याचा प्रत्येक श्वास मुलांच्या स्वप्नांसाठी वाहिलेला असतो.त्याचे दुःख,त्याचे अश्रू तो कधीच दाखवत नाही.कारण त्याला माहित असते की त्याच्या चेहऱ्यावरचं दुःख दिसलं,तर घरातील प्रत्येकाची पावलं थांबतील.”त्यांच्या प्रेरणादायी व्याख्यानाने विद्यार्थी व पालक दोघांच्याही डोळ्यात अश्रू तरळले लेखक हंकारे यांनी पालक-मुलांच्या नात्यांमधील संवादाचे महत्त्व पटवून देत अनेक हृदयस्पर्शी उदाहरणे मांडली.
मुलगा इंजिनिअर होतो, डॉक्टर होतो,परदेशात मोठ्या पगारावर जातो पण या यशाच्या मागे बापाच्या आयुष्यभराच्या त्यागाचे ऋण असते हे सांगायला ते विसरले नाही,छोट्या छोट्या गरजा बाजूला ठेवून मुलाच्या शिक्षणासाठी धडपडणारा बाप म्हणजे त्यागाची साक्षात मूर्ती.असे मांडताच श्रोता वर्ग स्तब्ध झाला.या भाषणाने उपस्थित श्रोत्यांच्या मनात भावनांचा महापूर उसळला.अनेक विद्यार्थी डोळ्यांत पाणी आणून म्हणाले की, “आजवर आईवर किती प्रेम करतो हे सांगत आलो,पण बापावरचं तेवढं प्रेम कधी व्यक्तच कधी झालं नाही,आता लगेच घरी जाऊन बापाला मिठी मारुन सांगणार आम्ही तुमच्यावर खूप प्रेम करतो.”
प्रसंगी बदलत्या युगातील सामाजिक वास्तवाचे भान देत
लेखक हंकारेंनी आजच्या बदलत्या समाज व्यवस्थेवरही प्रकाश टाकत ते म्हणाले की आधुनिकतेच्या धावपळीत अनेकदा बापाचे मोल कमी समजले जाते.मोबाईल,करिअर आणि बाह्य आकर्षणाच्या मागे धावणाऱ्या मुलांनी आपल्या पालकांशी संवाद साधणे विसरले आहे.कुटुंबसंस्था टिकवायची असेल,तर पित्याच्या त्यागाची जाणीव होऊन पालकांविषयी कृतज्ञता व्यक्त करणे अत्यावश्यक आहे.
त्यांच्या व्याख्यानातून पालकांविषयी आदर,कृतज्ञता आणि जीवनमूल्यांची शिकवण प्रत्येक श्रोत्यास मिळाली.विद्यार्थ्यांसाठी जीवनपाठ काय असतो तो प्रबोधनकार हंकारेंनी सांगितला “यशस्वी होण्यापेक्षा चांगला माणूस होणे महत्त्वाचे आहे.बापाच्या डोळ्यात आनंदाश्रू आणणे हेच मुलांचे खरे यश आहे.या विचारांनी संपूर्ण सभागृह भारावून गेले.कार्यक्रमाला शेकडो विद्यार्थी, शिक्षक,पालक व ग्रामस्थ मोठ्या उत्साहाने उपस्थित होते. व्याख्यानानंतर उपस्थितांमध्ये पालकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा निर्धार दिसून आला.
कार्यक्रमाचे आयोजन मांचीहिल संस्थान व मांचीहिल शैक्षणिक संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.अखेर आयोजकांनी आभार मानताना सांगितले की लेखक वसंत हंकारेंच्या विचारांमुळे विद्यार्थ्यांच्या मनावर अविट ठसा उमटला आहे. त्यांच्या संवेदनशील व्याख्यानातून विद्यार्थ्यांमध्ये नव्हे तर प्रत्येक कुटुंबामध्ये एक नवा भावनिक पूल निर्माण झाला आहे.”
यावेळी संस्थाप्रमुख शाळीग्राम होडगर ,अध्यक्ष विजय पिसे,उपाध्यक्ष आण्णासाहेब बलमे,उपप्राचार्य गंगाधर चिधे,सुनिल आढाव ,संजीव लोखंडे ,शीतल सांबरे व पालक वर्ग मोठ्या संखेने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशिकांत गमे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
