महंत उद्धवगिरी महाराज मंडलिक यांचे गौरवोद्गार
आश्वी संजय गायकवाड संगमनेर तालुक्यातील मांची हिल संस्थान येथे आनंदसागर अध्यात्मिक अध्ययन केंद्राचा शुभारंभ मोठ्या श्रद्धाभावाने पार पडला. या प्रसंगी उद्घाटक महंत ह. भ. प. उद्धवगिरी महाराज मंडलिक यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक करताना सांगितले की – “आजच्या विध्वंसक काळात आधुनिकतेसोबत अध्यात्माची जोड देणे ही खरी काळाची गरज आहे. विद्यार्थी फक्त शैक्षणिक दृष्ट्या नव्हे तर एक चांगला माणूस म्हणून घडावा, हा मांचीहिल संस्थानचा उपक्रम अत्यंत प्रशंसनीय आहे.”
या प्रसंगी विद्यार्थ्यांनी भगवद्गीतेच्या पंधराव्या अध्यायाचे पाठांतर सादर केले.संस्कृत पठणामुळे उच्चार सुधारतात, बुद्धीची क्षमता वाढते आणि विचारांना व्यापकता मिळते, असेही गुरुवर्यांनी मत व्यक्त केले.
संस्थापक शाळीग्राम होडगर यांनी या उपक्रमाचा उद्देश स्पष्ट करताना सांगितले की, “विद्येबरोबर अध्यात्म देऊन विद्यार्थी मन, मनगट व मेंदू या तीनही स्तरांवर सक्षम व्हावेत, यासाठी संस्थेचे कार्य सुरू आहे.”
कार्यक्रमात किर्तनचंद्रिका ह. भ. प. रोहिणी परांजपे यांनी किर्तनातून अध्यात्माचा महिमा उलगडला.त्यांनी सांगितले की, अर्थार्जनाच्या धावपळीत अर्थपूर्ण जीवन जगणं विसरलं जातं; पण मांचीहिल संस्थान हेच जीवनाला खऱ्या अर्थाने दिशा दाखवणारं ठिकाण आहे. “भौतिक प्रगती कितीही केली, तरी अध्यात्म हाच जीवनाचा आधार असावा त्यातून परमात्म्याचे अधिष्ठान लाभते असे त्यांनी संत संस्कृतीचे प्रमाण देत प्रतिपादन केले.
