पीएमई-बस योजनेच्या ५० बस जानेवारीत नाशकात धावणार
नाशिक दिनकर गायकवाड केंद्र सरकारकडून नाशिक महापालिकेला पीएम ई-बस योजनेंतर्गत १०० इलेक्ट्रिक बसेस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात पन्नास ई-बसेस नाशिकला मिळणार आहेत. त्यासाठीची प्रक्रिया काही महिन्यांपासून महापालिकेच्या यांत्रिकी विभागाकडून सुरू होती. वीजजोडणीचे काम अंतिम टप्प्यात आल्याने इलेक्ट्रिक बसचा मार्ग मोकळा झाला आहे.
नाशकात पुढील वर्षीच्या जानेवारीत ५० ई-बसेस सिटीलिंकच्या ताफ्यात दाखल होणार आहेत.
केंद्र सरकारने महाराष्ट्रातील विविध शहरांत इलेक्ट्रिक बसेस पुरविण्यासाठी जीबीएम इको लाइफ मोबेलिटी या कंपनीसोबत करार केला आहे. त्यानुसार नाशिकला ५० बसेस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
महापालिकेच्या सिटीलिंक बससेवेच्या ताफ्यात २०० सीएनजी व ५० डिझेल बसेस आहेत. मात्र, यातील ५० डिझेल बसेस थांबविण्याच्या विचारात प्रशासन होते. त्या बसेसही सुरूच असणार आहेत. केंद्र शासनाने पीएमई बस योजनेंतर्गत इलेक्ट्रिक बसेस पुरविण्यासाठी जीबीएम इको-लाइफ मोबेलिटी या कंपनीसोबत करार केला आहे.नाशिक मनपाला पहिल्या टप्प्यात ५० बसेस देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. महापालिकेने आडगाव येथे १०० बसेससाठी डेपो उभारला आहे. यासाठी २७ कोटींचा खर्च असून, एन कॅप निधीतून हा खर्च करण्यात आला आहे.
कुंभमेळा तोंडावर आला असून, अशावेळी सिटीलिंकच्या ताफ्यात १०० इलेक्ट्रिक बस दाखल होणार आहेत. त्यामुळे या बसेसचा फायदा सिंहस्थात मोठ्या प्रमाणात होईल. सिंहस्थापूर्वी पहिल्या टप्प्यात ५० व दुसऱ्या टप्प्यात ५० अशा शंभर बसेस उपलब्ध होणार आहेत.
