आश्वी संजय गायकवाड संगमनेर तालुक्यातील शेडगाव येथील सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात विद्यालय,या शाळेचा विकास माजी विद्यार्थ्यांच्या तसेच दानशूर ग्रामस्थ्यांच्या योगदानामुळे गतिमान झाला आहे.आपल्या मातृशाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थ एकत्र येऊन शाळेच्या उभारणीसाठी मदतीचा हात देत आहेत.
माजी विद्यार्थ्यांच्या योगदानातून शाळेत नवनवीन शैक्षणिक साधनांची भर पडली आहे. इंटिरिऍक्टिव्ह पॅनल, वाय-फाय मोडेम,निसर्गरम्य बाग,ताशी २५० लिटर शुद्ध पाणी पुरवठा करणारे यंत्र, इन्व्हर्टर, पाणी साठविण्याचे शितगृह तसेच क्रीडा साहित्य शाळेत उपलब्ध झाले आहे.अलीकडेच अनेक माजी विद्यार्थ्यांनी व्हॉट्सअॅप गटाच्या माध्यमातून आणखी विकासकामांचा संकल्प केला आहे.
मुख्याध्यापक अशोक गिते म्हणाले, “माजी विद्यार्थी व ग्रामस्थ यांचा हातभार हा शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी महत्वाचा आहे. त्यांच्या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवीन उमेदीने शिक्षण घेण्याची ऊर्जा निर्माण झाली आहे.”
या उपक्रमामुळे शिक्षक,विद्यार्थी व पालक वर्गामध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं असून, माजी विद्यार्थ्यांचा हा आदर्श उपक्रम इतर शाळांसाठीही प्रेरणादायी ठरत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
