-चिमुकल्या विद्यार्थ्यांकडून मोबाईलच्या दुष्परिणामांवरील प्रभावी संदेश वाखाण्याजोगा.
आश्वी संजय गायकवाड गणपती उत्सवात सामाजिक संदेश देणाऱ्या सार्वजनिक मंडळांचे नेहमी कौतुक होत असते,संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील बालपण स्कूलच्या विद्यार्थ्यांनी या गणेशोत्सवाला वेगळी दिशा देत येथील नर्सरी,एलकेजी व युकेजी वर्गातील चिमुकल्यांनी यावर्षी पर्यावरणपूरक गणेश मूर्ती स्थापन केली.
विशेष म्हणजे या गणेश मंडपात मुलांनी मोबाईलच्या अति वापरावर भाष्य करत त्यांचे दुष्परिणाम देखाव्या द्वारे सादर करून समाजासमोर मोठा संदेश दिला तो मुळातच वाखाण्याजोगा ठरला.सध्या मोबाईल कंपन्यांच्या अमर्यादित नेटवर्कमुळे सोशल मीडिया,इंस्टाग्राम, फेसबुक व व्हॉट्सअॅपचा यांचा विनाकारण अति वापर वाढला आहे.
परंतु हा अति वापर मानवी जीवनाला घातक ठरु पाहत आहे त्यातुन डोळ्यांचे आजार लहान मुलांमध्ये मोबाईलचे व्यसन या सर्व गोष्टींचा धोका दाखवून "मोबाईलपासून सावध राहा" हा संदेश चिमुकल्यांनी यावेळी दिला या देखाव्यातून अनेक नागरिक प्रेक्षक अंतर्मुख झाले.
दररोज गणपती बाप्पाच्या आरती सोबत गणपती स्तोत्र पठण आणि मोबाईल न वापरण्याची प्रतिज्ञा प्रसंगी मुलांनी केली. तसेच छोटेखानी नाटिकेद्वारे "मोबाईलचे दुष्परिणाम" समाजापुढे मांडले. पर्यावरणपूरक सजावट, संस्कारमय गणेशोत्सव आणि मोबाईलविरोधी संदेश या उपक्रमामुळे मुलांमध्ये जागृती होत आहे हे कौतुकास्पद आहे अशा भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केल्या.
या उपक्रमात चिमुकल्यांनी यज्ञ पठण व गणपती स्तोत्र पठण करून अध्यात्मिक ज्ञानाचेही महत्त्व अधोरेखित केले,जणू अध्यात्माने जगाला विज्ञान दिले असे! प्रसंगी पालक व परिसरातील नागरिकांनी या अभिनव उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक केले.
हा सर्व उपक्रम बालपण स्कूल आश्वी खुर्द शाखेच्या सर्व शिक्षिका तसेच बालपण स्कूलच्या प्रमुख सौ.सोनाली मुंडे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आला होता.
चिमुकल्या विद्यार्थ्यांचे प्रयत्न प्रेरणादायी असून समाजाला योग्य दिशा देणारे ठरले आहेत.