नाशिक दिनकर गायकवाड गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी लक्षात घेता वाहतूक शाखा युनिट-२ नाशिक शहराकडून काही मार्गांवर बदल करण्यात आले आहेत.
विशेषतः रविवार कारंजा, अशोकस्तंभ, मेनरोड, सांगली बँक, शालीमार परिसरात होणारी गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. हे बदल दि. ६ सप्टेंबरपर्यंत दररोज संध्याकाळी ५ ते रात्री ११ वाजेपर्यंत लागू असतील.
वाहतूक शाखेच्या आदेशानुसार पंचवटी (निमाणी) येथून नाशिक रोडकडे जाणाऱ्या सिटीलिंक बसेसना संतोष टी पॉइंट, कन्नमवार ब्रिज, द्वारका मार्गे वळविण्यात आले आहे.
नाशिकरोडकडून पंचवटीकडे येणाऱ्या बसेसना द्वारका सर्कल, सारडा सर्कल, गडकरी सिग्नल, चांडक सर्कल, जुना सिटीबी मार्गे कॅनडा कॉर्नर, गंगापूर नाका, चोपडा लॉन्समार्गे पंचवटी येथे सोडण्यात येईल.
दरम्यान, अशोकस्तंभ, मेहेर सिग्नल, सिबीएस, शालीमार मार्गावरील बस वाहतूक संध्याकाळी ५ ते रात्री ११ वाजेपर्यंत बंद राहील.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. व्ही. वसावे यांनी नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले असून, बस प्रवाशांनी पर्यायी मार्गांचा वापर करून सहकार्य करावे, असे सांगितले आहे.