सार्वजनिक गणेशोत्सव कार्यक्रमात आठ महिलांचा विनयभंग
नाशिक दिनकर गायकवाड नाशकात गणेशोत्सवाच्या कार्यक्रमासाठी जमलेल्या महिलांना अश्लील भाषेत बोलून त्यांचा विनयभंग केल्याची घटना म्हसरूळ परिसरात घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी,की दि.३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास म्हसरूळ परिसरातील रामेश्वरनगर येथे राहणाऱ्या आठ ते नऊ महिला गणेशोत्सवाच्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी जमल्या होत्या.
त्यावेळी त्याच कॉलनीत राहणारा प्रवीण बळवंत सोनवणे हा त्याच्या आईवडिलांसमवेत तेथे आला होता.या महिलांना पाहताच त्याने त्यांना अर्वाच्च शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.तो त्यांना म्हणाला, "तुमची सर्वांची कॉलनीत लफडी आहेत. तुम्ही घरंदाज बायका नाहीत." एवढ्यावरच न थांबता अर्वाच्य भाषेत बोलून त्याने स्त्रीमनास लज्जा उत्पन्न होईल,असे वक्तव्य जोरजोराने ओरडून केले.
"तुम्ही माझ्या मुलाला व आईवडिलांना त्रास देता.मी तुमच्यावर गुन्हा दाखल करीन व तुमचा कार्यक्रम लावीन," अशी धमकी तो या महिलांना देऊ लागला. या प्रकरणी प्रवीण सोनवणे याच्याविरुद्ध म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून,पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एम.एफ.क्षीरसागर करीत आहेत.