नाशिक दिनकर गायकवाड काहीही कारण नसताना दोन टवाळखोरांनी फादरसह इतर दोन जणांना दांडक्याने व तलवारीने मारहाण करून जखमी केल्याची घटना येथील जत्रा हॉटेलजवळ घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी,की फिर्यादी इमानुएल रॉबर्ट अँथनी (वय ३०, रा. शिवाजी रोड, शालिमार) हे ३० ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास जत्रा हॉटेलजवळ राहणाऱ्या फादर फ्रॉकलिन अनुप यांच्या घरी पायी जात होते.
फादर यांच्या घराजवळ ते आले असता दोन अनोळखी इसमांपैकी एकाने त्यांना विनाकारण फायबरच्या दांडक्याने मारहाण केली. त्यावेळी दुसरा इसम त्यांच्यावर तलवार घेऊन धावून आला. घाबरलेल्या अँथनी यांनी फादर यांना जोरात आवाज दिला.
फादर व त्यांचे मित्र ॲलेन कॉर्नेल हे त्वरित घराबाहेर आले असता हे दोघे त्यांच्यावरही धावून गेले.हातातील फायबरच्या दांडक्याने त्यांनी फादर यांच्या गुडघ्यावर,तर ॲलेन यांच्या हातावर तलवार मारून त्यांना जखमी केले.यादरम्यान, इमानुएल अँथनी यांनी फोन करण्यासाठी मोबाईल हातात घेतला असता आरोपीने "आता तुम्हाला संपवूनच टाकतो," असा दम दिला.हा सर्व प्रकार पाहून तेथे गर्दी जमा झाल्याने दोघा आरोपींनी तेथून पळ काढला.
या प्रकरणी अँथनी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपींच्या विरुद्ध आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार बहिरम करीत आहेत.