देवळाली प्रवरा मधील सर्वपक्षीय शिष्टमंडळाची राहुरीच्या तहसीलदारांकडे मागणी.
राहुरी प्नतिनिधी तालुक्यातील देवळाली प्रवरा मध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे सरसकट पंचनामे करून कर्जमाफी व ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी देवळाली प्रवरा हद्दीतील सर्वपक्षीय शिष्टमंडळाने राहुरीचे तहसीलदार नामदेव पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनावर आप्पासाहेब भिमराज ढूस,शैलेंद्र शरदचंद्र कदम,विठ्ठल रंगनाथ चव्हाण, केदारनाथ रंगनाथ चव्हाण, बबनराव गजाबापू मुसमाडे, अरुण सुखदेव वाळके, सुभाष प्रकाश वाकळे, आदिनाथ रंभाजी कराळे,अरुण गणपत हारदे आदी नागरिकांनी स्वाक्षरी करून तहसीलदारांना समक्ष निवेदन दिले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा या ठिकाणी दिनांक २७ व २८ रोजी झालेल्या अतिवृष्टी सदृश्य पावसाने सोयाबीन,कपाशी,तूर, मका, मुग, घास, आले, ऊस आदी जवळपास सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.. तथापि,राहुरी तालुक्यातील शासनाची पर्जन्यमापक यंत्रणा कुचकामी असल्याने शासनाला येथे झालेल्या पावसाची सत्यता समजत नसल्याचे खात्रीलायक माहिती मिळाली आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यातील अतिवृष्टी दाखविण्यात आलेल्या तालुक्यांच्या यादीत राहुरी तालुक्याचा समावेश झालेला नसल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना मदत मिळण्यात त्याचा मोठा फटका बसणार आहे ..
देवळाली प्रवरा शहरात काल अतिवृष्टी झाल्याने ओढ्या नाल्यांना मोठा पूर आला आहे. कित्येक ठिकाणी रस्ते वाहून गेले आहेत. तसेच पिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साठल्याने जवळपास सर्वच पिकांचे नुकसान झाले आहे.. त्यामुळे देवळाली प्रवरा शहरातील पिकांचे सरसकट पंचनामे करण्याचे संबंधितांना आदेश द्यावेत व पंजाब प्रांताने शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीप्रमाणे येथील शेतकऱ्यांना मदत देनेकामी तसेच ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी शासनाला आपले स्तरावरून अहवाल सादर करावा अशी निवेदनाचे शेवटी विनंती करण्यात आली आहे..
प्रसंगी आप्पासाहेब ढूस, शैलेंद्र कदम, केदारनाथ चव्हाण आदींनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की, देवळाली प्रवरा शहरामध्ये सरसकट पंचनामे करण्याचे आम्ही निवेदनाद्वारे तहसीलदारांना विनंती केली आहे.व त्यानुसार शासनाच्या आदेशाने पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन तहसीलदारांनी आम्हाला दिले असून लवकरच शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे होतील अशी अपेक्षा आहे.
