शिर्डी विशाल वाकचौरे विश्व हिंदू परिषद धर्माचार्य संपर्क आयामातर्फे राज्यस्तरीय युवा संत चिंतन वर्गाचे आयोजन दिनांक ५ ते ७ ऑक्टोबर २०२५ रोजी शिर्डी येथे करण्यात आले आहे. या वर्गामध्ये महाराष्ट्रातील विविध संप्रदायांतील ४०० ते ५०० युवा संत, प्रवचनकार, कीर्तनकार, कथाकार आदी सहभागी होणार आहेत.
या वर्गाचे उद्घाटन विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सह संघटन महामंत्री माननीय विनायक देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून, परिषदेचे केंद्रीय धर्माचार्य संपर्क प्रमुख अशोक तिवारी तसेच सहप्रमुख हरीशंकर हेही उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
याशिवाय पूज्य भास्करगिरी महाराज, रामगिरी महाराज, चिदंबरम साखरे महाराज आदी जेष्ठ संतांचे मार्गदर्शन मिळणार आहे. वाराणसीहून केवळ याच वर्गासाठी येणारे पूज्य जितेंद्रानंद महाराज हे विशेष आशीर्वादपर मार्गदर्शन करणार आहेत. राज्यातील विविध पंथांचे सध्या धार्मिक क्षेत्रात कार्यरत असणारे वंशज संत यांनाही या वर्गात आमंत्रित केले आहे.
या प्रसंगी युवा संतांना डिजिटल युगातील आव्हाने, धर्मप्रसारासाठी तंत्रज्ञानाचा व सोशल मीडियाचा उपयोग, खोट्या विमर्शाला उत्तर कसे द्यावे आदी विषयांवर विशेष सत्रांद्वारे मार्गदर्शन करण्यात येईल.
अहिल्यानगर नगर येथे आज पत्रकार परिषदेत माहिती देताना विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र-गोवा राज्याचे धार्मिक विभाग प्रमुख संजय मुरदाळे म्हणाले, "आजच्या काळात धर्मविरोधी विचार वेगवेगळ्या माध्यमांतून पसरवले जात आहेत. त्याला योग्य उत्तर देण्यासाठी संत वर्गानेच पुढाकार घेतला पाहिजे. युवा संतांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा सकारात्मक उपयोग करून समाजामध्ये सत्य आणि सनातन मूल्ये पोहोचवली, तर संपूर्ण समाजजीवनावर त्याचा मोठा परिणाम दिसेल."
यावेळी पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे धर्माचार्य संपर्क प्रमुख हरिभक्तिपरायण माधवदास राठी महाराज म्हणाले, "संत परंपरेचे मुख्य कार्य म्हणजे लोकजागृती आणि धर्मसंरक्षण या चिंतन वर्गामुळे युवा संतांमध्ये एकत्र येऊन विचारांची देवाणघेवाण होईल. समाजाला दिशा देण्याची ताकद या संतवर्गामध्ये आहे. शिर्डीचा हा तीन दिवसांचा वर्ग महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी ठरेल."
प्रारंभीची प्रस्तावना अहिल्यानगर जिल्ह्याचे मंत्री विशाल वाकचौरे, अनिल जोशी यांनी केली. यावेळी जिल्हा अध्यक्ष माननीय अभिषेक लांडगे यांनी सांगितले की, "अहिल्यानगर जिल्ह्यातून १०० युवा संत विविध संप्रदायांचे या वर्गात सहभागी होणार आहेत."
या तीन दिवसीय चिंतन वर्गामुळे शिर्डी येथे संत-समाजकार्यातील विचारांची देवाणघेवाण होऊन समाजजीवनात सकारात्मकतेचा संदेश जाईल, असा विश्वास आयोजकांच्या वतीने जिल्हा सहमंत्री सुरेंद्र महाले, गोपाल राठी, वाल्मिक धात्रक, प्रशांत बेल्हेकर, दिपक शिनगर, योगेश मखाना,बजरंग दल जिल्हा संयोजक शुभम मुर्तडक व ईश्वर टिळेकर यांनी व्यक्त केला आहे.
