विश्व हिंदु परिषद महाराष्ट्र व गोवा राज्य धार्मिक विभागाचा उपक्रम
शिर्डी विशाल वाकचौरे विश्व हिंदू परिषद महाराष्ट्र व गोवा राज्य धार्मिक विभागाच्या वतीने शिर्डी येथे ५, ६ आणि ७ ऑक्टोबर या तीन दिवस “राज्यस्तरीय युवा संत चिंतन वर्ग” आयोजित करण्यात आला आहे. या संदर्भाची माहिती क्षेत्र धार्मिक विभाग प्रमुख संजय मुदराळे आणि पश्चिम महाराष्ट्र धर्माचार्य संपर्क प्रमुख हभप माधवदास राठी महाराज यांनी दिली.
शिर्डीत २५ सप्टेंबर रोजी झालेल्या व्यापक बैठकीनंतर धर्माचार्य संपर्क सहप्रमुख नागनाथ बोंगरगे यांनी सांगितले की,हिंदू धर्मातील सर्व संप्रदायांतील युवा संत, प्रबोधनकार,कीर्तनकार, प्रवचनकार व कथाकार यांच्यासाठी हा वर्ग विशेष उपयुक्त ठरणार आहे.सर्व युवा संत तीनही दिवस मुक्कामी राहणार आहेत. या वर्गामध्ये आध्यात्मिक साधना व समाज प्रबोधनाचे संकेत,संतांचे आरोग्य, समाजा समोरील आव्हाने,राष्ट्र जागरणातील संतांची भूमिका,हिंदू धर्मासमोरील समस्या व उपाय या विषयांवर क्षेत्रीय व राष्ट्रीय संतांचे मार्गदर्शन होणार आहे. तसेच सर्वांचे संयुक्त चिंतन, डिजिटल कौशल्य विकास आणि चर्चा यांचाही समावेश असेल.
या वर्गात सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी परिषदेचे नगर जिल्हा धर्माचार्य संपर्क प्रमुख प्रशांत बहिरट (९५११५९२५५५) किंवा मिलिंद चवंडके (९४२२४९५२८९) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
उपक्रमासाठी जिल्हामंत्री विशाल वाकचौरे,अनिल जोशी, सचिन तांबे, जिल्हा सहमंत्री सुरेंद्र महाले,गोपाल राठी, धर्मप्रसार प्रांत सदस्य प्रशांत बेल्हेकर, कोषाध्यक्ष वाल्मिक धात्रक, दिपक शिनगर,योगेश मखाना,बजरंग दल जिल्हा संयोजक शुभम मुर्तडक व ईश्वर टिळेकर यांनी सर्व इच्छुक युवा संतांना सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
