आश्वी संजय गायकवाड संगमनेर तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ मानल्या जाणाऱ्या आश्वी परिसरात गत तीन महिन्यांपासून ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.ग्राहक सेवा केंद्र चालक,मेडिकल व्यवसायिक,शेतकरी तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची सुमारे १० लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे धक्कादायक चित्र समोर येत सर्वत्र चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
ऑनलाइन झोलझाल पार्श्वभूमीवर आश्वी खुर्द येथे शनिवारी दुपारी घडलेल्या घटनेने सर्वांनाच हादरवून सोडले. गावातील एका जेष्ठ सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला भाडेकरू असल्याचे भासवून तब्बल १९,००० हजारांचा ऑनलाईन गंडा घालण्यात आला.
जेवण करत असताना पीडितांना फोन आला –
“हॅलो, मै आपके रूम का किरायदार बोल रहा हूं, मेरा फोन-पे नंबर बंद है। मेरा दोस्त हॉस्पिटल में है| उसको अर्जंट १९ हज़ार रुपए भेजो,मैं आपको १० मिनिट में पैसे लौटा दूंगा.”
या खोट्या आर्जवाला बळी पडत पीडिताने सुरुवातीला तीनदा ५,००० रुपये (एकूण १५,०००) ट्रान्सफर केले. नंतर फसवणूक करणाऱ्याने स्क्रिनशॉट पाठवत पुन्हा क्यू आर कोड शेअर केला आणि आणखी पैसे टाकण्यास सांगितले.त्यात दोनदा २,००० रुपये भरल्यानंतर तिसऱ्या व्यवहारात पैसे अडकले. त्यावेळी खात्यातील शिल्लक तपासल्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
यानंतर सायबर भामट्याने व्हॉट्सअप मेसेजेस नष्ट करून फोन बंद केला.मग तात्काळ पीडित आश्वी पोलिस ठाण्यात गेले.पोलिसांनी सायबर क्राईम ऑनलाईन पोर्टलवर तक्रार करण्याचा सल्ला दिला असून तक्रार नोंदविण्यात आली आहे.
यापूर्वीही परिसरात अशा घटना कधी “मी पोलिस ठाण्यामधून पोलिस निरीक्षक राऊत बोलतोय”, कधी “मी आश्वी आरोग्य केंद्रातून डॉ. सोमाणी बोलतेय”, तर कधी “स्टेट बँकेतून बोलतोय, तुमचे क्रेडीट कार्ड बिल थकलंय” अशा बहाण्यांनी लोकांना गंडा घालण्यात आला आहे.अगदी कर्ज न घेतलेल्या व्यक्तींनाही दंडाची भीती दाखवून पैसे उकळल्याच्या घटना नोंदल्या गेल्या आहेत.
अशावेळी पोलिसांनी नागरिकांसाठी जागरूकतेचा इशारा दिला आहे की कोणताही आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी त्याची खात्री करा.
अनोळखी लिंक, क्यू आर कोड किंवा अनोळखी नंबरवर व्यवहार करू नका.
संशयास्पद मेसेज किंवा कॉल आला तर तातडीने पोलिस किंवा सायबर क्राईम कडे संपर्क साधा.
ऑनलाईन फसवणुकीचे जाळे दिवसेंदिवस वाढत असून त्यातून सुटकेचा मार्ग म्हणजे नागरिकांची जागरूकता. सावधान राहा, सुरक्षित राहा! असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
- सायबर ऑनलाइन पोर्टल असून अडचण आणि नसून खोळंबा,पोलिसांचे दुर्लक्ष
“ऑनलाईन फसवणुकीच्या वाढत्या घटनांमुळे सामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. पीडीत लोक तक्रारीसाठी स्थानिक पोलिस ठाण्यात जातात,मात्र तेथे तक्रार दाखल करून काहीही होत नाही.फक्त ‘सायबर ऑनलाईन पोर्टलवर तक्रार दाखल करा’ एवढेच सांगितले जाते. त्यानंतर त्या तक्रारीवर पुढे काहीच कारवाई होत नाही. हे पोर्टल असून अडचण नसून खोळंबा निर्माण करणारे आहे त्यातून न्याय मिळेल याची शाश्वती नाही, परिणामी फसवले गेलेल्या पीडीतांना न्याय मिळत नसल्याने संताप व्यक्त होत आहे या संदर्भात ठोस तरतूद नसल्यानेच ऑनलाईन फसवणूक दिवसेंदिवस वाढत चालली आहे.”
