दाढ खुर्द ते बुद्रुक रस्ता खड्डेमय!

Cityline Media
0
नागरिकांचा जीव धोक्यात; निवडणुकीपूर्वी पूर्ण डांबरी करणाची जोरदार मागणी

आश्वी संजय गायकवाड संगमनेर तालुक्यातील दाढ खुर्द फाटा ते दाढ बुद्रुक या अवघ्या ३ कि.मी अंतराच्या रस्त्याची परिस्थिती सध्या अतिशय दयनीय झाली आहे.रस्त्यावर ठिकठिकाणी प्रचंड खड्डे पडल्याने प्रवाशांचा जीव अक्षरशःधोक्यात आला आहे. पावसामुळे हे खड्डे पाण्याने भरले असून रोजच अपघात घडत आहेत. या रस्त्यावर प्रवास करणाऱ्यांना अपंगत्व सुद्धा आले आहे.
हा रस्ता दाढ खुर्द,झरेकाठी, खळी,पिंप्री, खरशिंदे, चणेगाव,शिबलापूर अशा अनेक गावांना प्रवरा नदीवरील पुलाद्वारे जोडतो. या मार्गावरून लोणी येथील महाविद्यालयीन विद्यार्थी, प्रवरा मेडिकल हॉस्पिटल मधील कर्मचारी व रुग्ण, तसेच प्रवरानगर येथील शिक्षण संस्था व कारखान्यातील कामगार रोजच्या रोज प्रवास करतात. बाजारपेठ,दवाखाने दाढ बुद्रुक येथे असल्यानेही या मार्गावर मोठी वर्दळ असते.

जलजीवन मिशनच्या कामासाठी रस्ते खोदल्याने चिखल व खड्ड्यांची स्थिती अधिकच बिकट झाली. ग्रामपंचायतीने काही दिवसांपूर्वी मुरुमवजा लाल माती टाकून तात्पुरती डागडुजी केली होती, मात्र पावसाच्या सरींनी सगळे खड्डे पुन्हा उघडे पडले आहेत.नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

आज गावोगावी ‘विकसित भारत’ची स्वप्ने रंगवली जात असताना,गाव विकासातला सर्वात महत्वाचा दुवा असलेला रस्ताच जर खड्ड्यात गेला तर विकासाचे चित्र खड्ड्यात गेल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका ग्रामस्थांतून होत आहे.

गावपुढाऱ्यांनी फक्त लोकप्रतिनिधीं सोबत फोटोसेशन करून थांबू नये,तर प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करून हा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अशी मागणी होत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी दाढ खुर्द फाटा–दाढ बु. रस्ता संपूर्ण डांबरीकरण करून नागरिकांना दिलासा द्यावा,अशी ठाम मागणी दाढ खुर्द परिसरातील सर्वच नागरिकांनी केली आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!