अनेक निष्पाप नागरिकांनी गमावले प्राण, कायमस्वरूपी अपंगत्वाचे सावट
आश्वी संजय गायकवाड संगमनेर-लोणी-कोल्हार या राज्य महामार्गाला जोडणाऱ्या मांची फाटा येथे नित्याने वाढत्या अपघातांमुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.भरधाव वेगातील वाहनांवर नियंत्रण नसल्यामुळे अनेक निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत, तर काहींना कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे स्थानिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तातडीने गतिरोधक बसवण्याची मागणी केली आहे.
संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक ते मांची फाटा हा रस्ता पंचक्रोशीतील गावांना संगमनेर, लोणी,नाशिक, श्रीरामपूर, किंवा अहमदनगरकडे जाण्यासाठी सोयीस्कर आहे.या रस्त्यावर दिवसेंदिवस लोकवस्ती वाढत असून रहनदारी देखील वाढत असून,येथे मांचीहिल शैक्षणिक आणि औद्योगिक संकुल असल्यामुळे विद्यार्थी, पालक, शिक्षक तसेच रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांची नियमित वर्दळ असते.
अपघातांचे वाढते प्रमाण महामार्गाला जोडणाऱ्या या फाट्यावर गतिरोधक नसल्यामुळे वाहनचालक बेकदरपणे गाड्या चालवतात,ज्यामुळे अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत एका महाविद्यालयीन विद्यार्थ्यासह दोन-तीन जणांनी अपघातात जीव गमावला आहे, तर अनेकांना कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे.नुकताच संगमनेरच्या दिशेने येणाऱ्या एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा भीषण अपघात झाला,ज्यात दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले.सुदैवाने,ती विद्यार्थिनी बालंबाल बचावली. या घटनेमुळे परिसरात मोठी भीती पसरली असून लोक चिंता व्यक्त करत आहे.
या गंभीर परिस्थितीची दखल घेत,स्थानिक नागरिकांनी आणि पंचक्रोशीतील लोकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने गतिरोधक बसवावे अशी मागणी केली आहे.या समस्येवर त्वरित तोडगा काढण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.मांची फाटा येथे गतिरोधक बसवल्यास भविष्यात होणारे अपघात टळू शकतील आणि अनेक जीव वाचवता येतील, अशी आशा सुज्ञ लोकांनी व्यक्त केली आहे.
