नाशिक दिनकर गायकवाड शिवाजीनगर परिसरातील अभिषेक बेकरीमध्ये पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याने परिसरात खळबळ उडाली. या आगीत बेकरीमधील सर्व साहित्य जळून खाक झाले असून, यात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.
आगीमध्ये बेकरीतील साहित्य, यंत्रसामग्री, कच्चा माल व तयार माल जळून खाक झाला असून ४ ते ५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे बेकरी मालकाने सांगितले.
या घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांनी अवघ्या काही मिनिटांत धाव घेत शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.
आग विझविण्यासाठी सातपूर, अंबड एमआयडीसी, सिडको व सातपूर एमआयडीसी येथील सहा ते सात बंब मागविण्यात आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र बेकरीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने मालक व कामगार वर्गावर आर्थिक संकट ओढावले आहे.
घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमले होते. पोलिसांनी या गर्दीवर नियंत्रण आणले.ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
