६०० वकिलांच्या मागणी पत्रावर सह्या
नाशिक दिनकर गायकवाड नाशिक जिल्हा न्यायालयाच्या नव्या इमारतीचे उद्घाटन २७ सप्टेंबरला होणार आहे.सदर इमारतीचे उद्घाटन भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.नव्या इमारतीच्या उद्घाटन दिवशी जिल्हा न्यायालयाच्या आवारात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारावा, अशी मागणी जिल्ह्यातील वकिलांकडून करण्यात आली आहे. सुमारे सहाशे वकिलांनी या संदर्भातील मागणीपत्रावर सह्या केल्या आहेत.
या संदर्भात नाशिक जिल्हा न्यायालयातील वकिलांनी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या मागणीचे निवेदन सादर केले आहे.संविधानाचे निर्माते आणि भारताचे पहिले कायदेमंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा नवी दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात उभारलेला भव्य पुतळा लक्षात घेता, नाशिक येथील नव्या इमारतीच्या दर्शनी भागात डॉ. आंबेडकर पूर्णाकृती पुतळा उभारावा, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.नाशिक शहर आणि जिल्ह्याविषयी बाबासाहेबांना विशेष प्रेम होते.ते आपल्या व्यस्त दिनचर्येतही नाशिकमध्ये येऊन मुक्काम करत असत.देशपातळीवर त्यांनी घेतलेले अनेक समाजहिताचे निर्णय नाशिकमध्येच ठरवले गेले आहेत.त्या अर्थाने,डॉ. आंबेडकर यांच्या सामाजिक आणि राजकीय जीवनात नाशिक शहर व जिल्ह्याला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे नाशिककरांमध्ये त्यांची स्मृती कायम टिकावी आणि वकिलांना त्यांच्या दैनंदिन कार्यात नियमित ऊर्जा मिळावी, हेसुद्धा या पुतळ्याच्या स्थापनेमुळे साध्य होईल. त्याचप्रमाणे, नाशिक जिल्हा न्यायालयात बाबासाहेब आंबेडकर यांनी काही विशेष खटलेही चालविले आहेत.
