गोपालकांचा सन्मान व गोसंवर्धनाचा संदेश देणारा अमोघ कार्यक्रम
अकोले विशाल वाकचौरे तालुक्यातील तालुक्यातील कोतुळ येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीच्या प्रारंभाचे औचित्य साधत वसुबारस सणानिमित्त सामुदायिक गोपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दीपावली सारख्या प्रमुख सणाची सुरुवात गोपूजनाने करण्याची परंपरा भारतीय संस्कृतीत प्राचीन काळापासून पाहायला मिळते.हिंदू धर्मात गोमातेचे प्रथम पूजन केल्याशिवाय कोणतेही दैवकार्य वा पितृकार्य पूर्ण होत नाही, अशी श्रद्धा आहे.
मागील वर्षी राज्य सरकारने गोमातेला ‘राजमातेचा दर्जा’ दिल्यामुळे राज्यात गोमातेचे महत्व आणखी वृद्धिंगत झाले आहे.गोमाता ही केवळ एक जनावर नसून भारतीय संस्कृतीचे प्रतीक आणि सकारात्मक ऊर्जेचा स्रोत मानली जाते.
जय भवानी संस्कृती संवर्धन मंडळ आणि श्री वरदविनायक देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने हा सामुदायिक गोपूजन सोहळा शुक्रवार, दि. १७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता श्री वरदविनायक मंदिराच्या आवारात पार पडणार आहे.
या सोहळ्यात भारतीय देशी गाईंचे पूजन करण्यात येणार असून, त्यांचे पालनपोषण करणाऱ्या गोपालकांचा विशेष सन्मान करण्यात येईल. गोमातेचे पूजन करणे व त्यासाठी समाजाला एकत्र आणणे ही हिंदू संस्कृतीतील एक महत्वाची परंपरा असल्याचे आयोजकांनी सांगितले.
देशी गाईंची संख्या दिवसेंदिवस घटत चालली असून, या सोहळ्याच्या माध्यमातून गोमातेचे धार्मिक,सांस्कृतिक आणि पर्यावरणीय महत्व समाजापर्यंत पोहोचविण्याचा व गोसंवर्धनाचा संदेश देण्याचा उद्देश आहे.
या पवित्र सोहळ्यास परिसरातील सर्व गोप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,गोमातेचे पूजन करून तिचा आशीर्वाद घ्यावा, असे आवाहन श्री वरदविनायक देवस्थानच्या वतीने प्रदीप भाटे, विनय समुद्र,विशाल बोऱ्हाडे, कुलदीप नेवासकर,संभाजी पोखरकर,सुभाष घाटकर,अजित आरोटे,सचिन पाटील,सागर सोनुले,संतोष नेवासकर आणि वासुदेव साळुंके यांनी केले आहे.
