आश्वी संजय गायकवाड अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी अखेर भाजपला मजबूत नाव मिळाले असून,अकोले तालुक्यातील अगस्ती साखर कारखान्याच्या उपाध्यक्षा सुनीता भांगरे यांनी आज मुंबईत भाजपमध्ये प्रवेश करताच त्या या पदाच्या प्रबळ दावेदार ठरल्या आहेत. अध्यक्षपद अनुसूचित जमात महिला प्रवर्गासाठी राखीव असल्याने या पदासाठी भाजपकडून योग्य उमेदवाराचा शोध सुरू होता.भांगरे यांच्या प्रवेशाने तो शोध संपल्याचे राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहे.
सुनीता भांगरे या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात कार्यरत होत्या.काही दिवसांपूर्वीच त्यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांची भेट घेतली होती. यानंतर आज मुंबईत प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्ष प्रवेश केला. यावेळी अनेक कार्यकर्तेही त्यांच्या सोबत होते.
भांगरे यांचे पती आणि जिल्हा परिषदेचे मा.अध्यक्ष स्व.अशोक भांगरे यांच्या आकस्मिक निधनानंतर शरद पवार यांनी अकोल्यात येऊन अमित भांगरे व सुनीता भांगरे यांना बळ देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार त्यांनी प्रयत्न केले,मात्र अपेक्षित संधी न मिळाल्याने अखेर त्यांनी भाजपचा ध्वज हाती घेतला.
जिल्हा परिषद निवडणुका जवळ येत असताना भांगरे यांच्या या निर्णयाने अकोले तालुक्यात तसेच जिल्हा राजकारणात नव्या राजकीय समीकरणांना सुरुवात झाली आहे.
आगामी काळात भाजप त्यांची अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा कधी करतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
