मांची-आश्वी रस्त्यावर जीवघेणा सापळा;शासन झोपेत!
आश्वी संजय गायकवाड संगमनेर तालुक्यातील
आश्वी बुद्रुक ते मांची फाटा हा रस्ता कोल्हार–घोटी राज्य मार्गाला जोडणारा अत्यंत महत्वाचा आणि वर्दळीचा मार्ग असून दररोज शेकडो वाहने, शिक्षक,विद्यार्थी, शेतकरी व प्रवासी या मार्गाने ये–जा करतात.मात्र गेल्या काही दिवसांपासून या मार्गावरील जुन्या ओढ्यावर असलेला पुल अपघातासाठी आमंत्रण देणारा धोकादायक बिंदू ठरत आहे.
या ओढ्याच्या परिसरात दहा बारा दिवसा पुर्वी अतिवृष्टीमुळे पाणी आले आहे पाणी वाहते तसेच साचलेले पाणी तब्बल १५ ते १७ फुट खोल आहे, तर पुलाच्या वर दोन फुट प्रवाह सुरू आहे.एवढ्या पाण्याखाली पुलाचा अर्धा भाग झाकला जात असून,त्यावरून जाणाऱ्यांना खोलाईचा अंदाजच येत नाही.याठिकाणी ना कोणतेही संरक्षण कठडे,ना दिशादर्शक फलक,ना चेतावणी चिन्ह,एवढंच काय तर पुलाच्या दोन्ही कडेला उगवलेल्या वेड्या बाभळीमुळे दृश्य अडथळा निर्माण झाला आहे.
ओढ्याच्या काठावर असलेले मंदिर सुद्धा पाण्याखाली गेले आहे. या दृश्याने परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.काही दिवसांपूर्वी पाणी नसताना कठड्यांची मागणी करणारी बातमी माध्यमात प्रसिद्ध झाली होती, मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने ती दखल घेतली नाही त्याकडे बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले त्यामुळेच आज मात्र परिस्थिती भीषण बनली आहे.
या मार्गाच्या दक्षिणेकडे मांची हिल शैक्षणिक संकुल असून येथे सुमारे दोनशे शिक्षक आणि दोन हजार विद्यार्थी शिक्षण घेतात.तर उत्तर दिशेला मांची गाव आहे सर्वजण दररोज या मार्गाने प्रवास करतात. पाण्याचा प्रवाह वाढला की मोटरसायकल स्वारांना अक्षरशः पायाने उतरून पुल ओलांडावा लागतो.रात्रीच्या वेळी तर या ठिकाणी कोणताही प्रकाश किंवा दिशादर्शक नसल्याने अपघाताचा धोका अनेकपटीने वाढतो.
हा मृत्यूचा सापळा बनु पाहणाऱ्या पुलाबाबत नागरिकांकडून संतप्त सुर उमटत आहे १५ फुट खोल ओढा,पुलावर २ फुट पाणी, आणि कोणतेही संरक्षण नाही! शासन अपघात झाल्यावरच जागे होणार का?” असा संतप्त सवाल विचारला जात आहे स्थानिक ग्रामस्थ आणि सामाजिक संघटनांनीही या ठिकाणी तातडीने मजबूत कठडे, चेतावणी फलक व सुरक्षा चिन्हे बसविण्याची मागणी केली आहे.अन्यथा पुढे एखादी दुर्घटना घडल्यास पूर्ण जबाबदारी शासन व सार्वजनिक बांधकाम विभागावर राहील, असा तीव्र इशारा नागरिकांनी दिला आहे.
या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देणाऱ्या प्रवाशांनी सांगितले की, जर एखादं वाहन किंवा दुचाकी या खोल पाण्यात गेले तर कोणतीही तातडीची मदत पोहोचवणं शक्य नाही. मोबाईल नेटवर्क नसल्याने आपत्कालीन संपर्कही तुटतो. त्यामुळे प्रशासनाने या ठिकाणी कायमस्वरूपी सुरक्षा यंत्रणा उभी करणे आवश्यक आहे.हा पुल नाही साक्षात मृत्यूचा सापळाच आहे नागरिकांनी स्पष्ट इशारा आहे की एखादी दुर्घटना घडली तरच गेंड्याची कातडी पांघरलेल्या शासनाला जाग येईल का?
