नाशिक दिनकर गायकवाड रिक्षामधून प्रवास करताना सहप्रवाशांनी एका वृद्ध दाम्पत्याचे १८ तोळे सोन्याचांदीचे दागिने व दहा हजार रुपये रोख चोरून नेल्याची घटना मेळा बसस्थानक ते त्रिमूर्ती चौकदरम्यान घडली.
याबाबत विमल राजाराम मत्सागर (वय ६८, रा. पाटीलनगर, त्रिमूर्ती चौक) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की दि. ६ ऑक्टोबर रोजी त्या पतीसमवेत दुपारी दोन ते अडीच वाजेदरम्यान मेळा बसस्थानकावरून त्रिमूर्ती चौक येथे जाण्यासाठी एका रिक्षात
बसल्या. यावेळी त्यांच्यासमवेत इतर दोन प्रवासीदेखील रिक्षामधून प्रवास करीत होते. या सहप्रवाशांनी मत्सागर दाम्पत्याकडील ३० ग्रॅम वजनाच्या तीन सोन्याच्या चेन, २० ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, १५ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, दहा ग्रॅम वजनाचे कानातील सोन्याचे जोड, सात ग्रॅम वजनाचा कानातील सोन्याचा एक जोड, पाच ग्रॅम वजनाचे कानातील सोन्याचे जोड, चार ग्रॅम वजनाचे कानातील सोन्याचे जोड, एक ग्रॅम वजनाचे कानातील सोन्याचे टॉप्स, १३ ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार, २५ ग्रॅम वजनाचे
सोन्याचे मंगळसूत्र,पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे वेल,सहा ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या,चार ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण,चार ग्रॅम वजनाचे सोन्याच्या बाळीचे जोड,२० ग्रॅम वजनाचे चांदीचे ब्रेसलेट,असे एकूण १८ तोळे वजनाचे सोन्याचांदीचे दागिने व दहा हजार रुपये रोख संगनमत करून चोरून नेले.या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात रिक्षाचालक व दोन इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक घुणावत करीत आहेत.
