नाशिक दिनकर गायकवाड पोलीस व नाशिक महानगरपालिका प्रशासनाने गुन्हेगारी टोळ्यांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे.
गुन्हेगारांचे मद्यपान करण्याचे अड्डे मानल्या जाणाऱ्या चायनीज,अंडाभुर्जी हातगाड्या, तसेच काही गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या संशयितांची अनधिकृत थाटलेली दुकाने हटविण्याचे काम पंचवटी
पोलिसांनी काल दुसऱ्या दिवशी केल्याने नागरिकांनी पोलिसांच्या या मोहिमेचे स्वागत केले आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत काल सकाळी परिसरातील गुन्हेगारी टोळक्यांचे मद्यपान अड्डे असलेल्या टपऱ्या व हातगाड्या हटविण्यात आल्या.पेठरोड, आरटीओ कॉर्नर भागातील गुन्हेगारी टोळक्यांचे मद्यपान अड्डे
उद्ध्वस्त केल्यानंतर काल नवीन आडगाव नाका, जुना आडगाव नाका, हिरावाडी, मनपा क्रीडा संकुल परिसर, पाट किनाऱ्यावर गेल्या अनेक महिन्यांपासून असलेली वादग्रस्त टपरी हटविण्यात आली.पंचवटी पोलीस व पंचवटी मनपा अतिक्रमण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या या मोहिमेत सुमारे २५ हून
अधिक टपऱ्या, हातगाड्या हटविण्यात आल्या आहेत.
हिरावाडी पाट किनारी असलेल्या पाटबंधारे विभागाच्या जागेवर अनेक महिन्यांपासून थाटलेली अनधिकृत टपरीदेखील पोलिसांनी हटविली आहे.पोलीस कारवाईत पाटालगतच्या टपरीचे बांधकाम हटविल्याने परिसरातील कॉलनी वसाहतीत राहणा-या नागरिकांनी समाधान व्यक्त करत पंचवटी पोलिसांच्या कामगिरीचे स्वागत केले आहे.
