नाशिक दिनकर गायकवाड हॉटेलमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणात अटक करण्यात आलेले माजी नगरसेवक तथा आरपीआयचे नेते प्रकाश लोंढे, त्यांचा मुलगा दीपक लोंढे व इतर संशयितांना काल न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने सर्वांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
युनिट एकच्या पोलीस कार्यालयातून कडक पोलीस बंदोबस्तात या आरोपींना न्यायालयात नेण्यात आले. त्यावेळी नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला अशा घोषणा देण्यात आल्या आणि त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
ही गोळीबाराची घटना सातपूर आयटीआय सिग्नल जवळील एका हॉटेलमध्ये घडली होती.या घटनेत तिवारी नावाचा एक ग्राहक गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी एकूण १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, काही प्रमुख आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांकडून अद्याप फरार असलेल्या भूषण लोंढे याच्या शोधासाठी चार वेगवेगळी पथके तयार करून विविध ठिकाणी रवाना करण्यात आली आहेत. गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर सातपूर परिसरात तणावाचे वातावरण असून, पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सातपूर पोलीस ठाणे व गुन्हे शाखा युनिट एक करत आहे.गोळीबाराच्या प्रकारांमुळे नाशिकमधील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून,पोलिसांची कारवाई व तपासाचा वेग वाढवण्यात येत आहे.
