आश्वी -संजय गायकवाड वारंवार जनसभा आयोजित करून प्रजातंत्रावर विश्वास वाढवण्याचा सामाजिक संदेश बुद्ध तत्त्वज्ञाने जगाला दिला असून बुद्धीजीवी तरुणांनी सामाजिक कार्यासाठी योगदान दिले पाहिजे असे प्रतिपादन अनिल मुन्तोडे यांनी केले. प्रसंगी पुढे बोलताना श्री.मुन्तोडे म्हणाले की शिकल्या-सवरलेलेल्या लोकांनी बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन संघर्षाची आठवण ठेऊन सामाजिक योगदान देणे आवश्यक आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या मार्गाने गेल्यानेच सामाजिक उन्नती साधता येईल.
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या आश्वी खुर्द व माळेवाडी शाखेच्या वतीने आयोजित विशेष स्वागत कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. आश्वी खुर्द शाखेतील कृषी पदवीधर सुशील मुन्तोडे व माळेवाडी शाखेतील रोहिदास मुन्तोडे यांनी नाशिक जिल्ह्यातील मुक्तिभूमी येवला येथे दहा दिवसीय निवासी श्रामणेर शिबीर यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल त्यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात आला.यावेळी त्यांना बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ भेट देण्यात आला. यावेळी ग्रामशाखेच्या वतीने उपस्थित प्रमुख अतिथींचा सत्कार करण्यात आला. संगमनेर तालुकाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी बुद्धवंदना सूत्रपठण करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. शिबलापूर शाखेचे अध्यक्ष संदीप मुन्तोडे व माळेवाडी शाखेचे अध्यक्ष सचिन मुन्तोडे यांनी यावेळी आपल्या शाखेतील कामकाजाबद्दल माहिती देवून आगामी सामाजिक प्रबोधन कार्याची माहिती दिली. संयुक्त जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष संजय मुन्तोडे यांनी महामानव बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला शेवटच्या घटकापर्यंत घेवून जाण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असून सामजिक प्रबोधनासाठी एकजुटीला महत्व असल्याचे सांगितले. कार्यक्रमात सुभजीत मुन्तोडे याने महाकवी वामनदादा कर्डक यांच्या गीताचे गायन करून उपस्थितांकडून टाळ्यांची दाद मिळवली.
