-नगरपालिका निवडणुकीत स्वतंत्र पॅनलची शक्यता
चित्ते नगराध्यक्षपदासाठी दावेदार!
श्रीरामपूर दिपक कदम राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत श्रीरामपुरातील एका मोठ्या राजकीय नेत्याच्या प्रवेश होताच सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला .भारतीय जनता पक्षाचे सर्वात जुना चेहरा आणि प्रदेश ओबीसी सेलचे मा. उपाध्यक्ष प्रकाश चित्ते यांनी कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे. ही घोषणा शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत दुपारी निश्चित करण्यात आली असून, यामुळे श्रीरामपूर नगरपालिका निवडणुकीत शिंदे गटाची ताकत वाढण्याची शक्यता आहे.
प्रकाश चित्ते हे भाजप मधील प्रभावशाली हिंदुत्ववादी नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या प्रवेश सोहळ्यात शिवसेनेचे तालुका संपर्कप्रमुख जनार्दन गालपगार, सुनिल मुथा, संजय पांडे,राजेंद्र कांबळे आणि मा.नगरसेवक किरण लुनिया उपस्थित होते. या प्रवेशामुळे शिंदे गटाला ओबीसी मतदारसंघात मजबूत आधार मिळेल असे राजकीय विश्लेषक सांगत आहेत.
श्रीरामपूर नगरपालिका निवडणुकीत स्वतंत्र पॅनलचा अंदाज प्राप्त माहितीनुसार श्रीरामपूर नगरपालिका निवडणुकीत मा.आमदार भानुदास मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गट स्वतंत्र पॅनल उभे करणार आहे. यात प्रकाश चित्ते यांना नगराध्यक्षपदासाठी उमेदवार म्हणून पाठिंबा देण्याची शक्यता जवळ जवळ निश्चित मानली जात आहे. हे पॅनल भाजपशी युती न करता स्वतंत्र लढणार असल्याने स्थानिक राजकारणात नवीन वळण येईल.
विवादास्पद मुद्दा चित्ते-बेग भांडण काय करेल?
गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर श्रीराम सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष सागर बेग हेही शिंदे गटात सामील झाले होते.मात्र, हिंदुत्ववादी संघटनांमध्ये चित्ते आणि बेग हे एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत. पक्षाकडून या भांडणाबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतला गेलेला नाही. पॅनलमध्ये बेग यांना काय स्थान मिळेल, याबाबत उत्सुकता आहे. पक्षातील अंतर्गत समन्वय कसा राहील, हे निवडणुकीचे निकाल ठरवेल असे बोलले जात आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या या रणनीतीमुळे महायुतीत नवीन चक्र चालू झाल्याचे दिसत आहे. श्रीरामपूर मधील ही राजकीय चळवळ आगामी स्थानिक निवडणुकांसाठी महत्त्वाची ठरेल.असा अंदाज वर्तविला जात आहे.
