नाशिक दिनकर गायकवाड टेलिग्राम ॲपवरील वेगवेगळ्या आयडीवरून बुटांच्या कंपनीत गुंतवणुकीवर अधिक नफा देण्याचे आमिष दाखवून एका इसमाला सायबर भामट्यांनी १४ लाख रुपयांना ऑनलाईन फसविले.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी,की टेलिग्राम ॲपवरून फिर्यादी यांना दहा विविध आयडीवरून वर्क फ्रॉम होमबाबत माहिती देण्यात आली. त्यामध्ये स्केचर्स या नामांकित बूट कंपनीत पैसे गुंतविल्यास अधिक नफा घरबसल्या मिळविण्याचे आमिष फिर्यादी यांना दाखविले. त्यासाठी त्यांनी दोन लिंक फिर्यादी
यांना पाठवून त्या लिंक ओपन करण्यास भाग पाडले. घरबसल्या केलेल्या गुंतवणुकीवर अधिक नफा मिळेल,या आमिषाला फिर्यादी भुलून त्यांनी आरोपींनी सांगितलेल्या बँक खात्यांवर १४ लाख २६ हजार ३११ रुपये भरले.फिर्यादीने ही रक्कम दि. १४ जून ते ३० जुलैदरम्यान गुंतविली.
कोणताही नफा किंवा परतावा न मिळाल्याने त्यांनी या सायबर भामट्यांविरुद्ध सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणी पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे करीत आहेत.
