खासगी सावकार विरुद्ध गुन्हा दाखल
नाशिक दिनकर गायकवाड तीन लाख रुपयांच्या व्याजापोटी १५ लाख रुपये व्याज देऊनही अधिक व्याजाची मागणी करून वृद्धेचा फ्लॅट स्वतःच्या आईच्या नावावर करून घेणाऱ्या खासगी सावकारासह त्याच्या इतर साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी सुशीला पंडितराव मोरे (रा. विलास विजय सोसायटी, गुलमोहरनगर, दिंडोरी रोड, नाशिक) यांनी खासगी सावकार विशाल सुभाषराव कदम (रा. गुलमोहरनगर, म्हसरूळ) याच्याकडून तीन लाख रुपये व्याजाने घेतले होते. त्या बदल्यात त्याला वेळोवेळी १५ लाख रुपये परत केले. तरी तो अधिक व्याजाची मागणी करीत असल्याने फिर्यादीच्या फ्लॅट क्रमांक ६ वर कर्ज काढून त्यातून व्याजाची रक्कम फेडण्याकरिता व फ्लॅटवर कर्ज मिळण्याकरिता आरोपीने दुय्यम निबंधक कार्यालय येथे घेऊन जात विशाल कदम याने त्याच्या आईच्या नावावर फ्लॅट खरेदी करून घेतला.
त्यानंतरही तो अधिक पैशाची मागणी करू लागल्याने त्याला फिर्यादी व त्याच्या नातेवाईकांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता त्याने उलट "तुमचा फ्लॅट हा माझ्या आईच्या नावावर झालेला
आहे. तुम्हाला काय करायचे, ते करा. परत येथे आलात तर तुमचा बेत पाहीन," असा दम दिला, तसेच फिर्यादी मोरे यांची मुलगी मंगल जाधव हिचा फ्लॅट हा खासगी सावकार विशाल कदम आणि त्याचा मित्र कैय्याज शेख (रा. वैदूवाडीसमोर, म्हसरूळ) यांनी जबरदस्तीने कब्जा करून "तुम्ही सदरचा फ्लॅट विसरून जा. जोपर्यंत विशाल कदम आणि माझी इच्छा असेल, तोपर्यंत आम्ही तुमच्या फ्लॅटवर कब्जा करून राहू.
तुम्ही आम्हाला बाहेर काढू शकत नाही. मी फ्लॅट खाली करणार नाही. तुम्हाला कोणाकडे जायचे आहे, त्याच्याकडे जा. परत येथे आलात, तर तुम्ही तुमच्या पायावर घरी परत जाणार नाही," अशी धमकी दिली. हा प्रकार सन २००७ते दि. २८ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत विलास विजय सोसायटी, म्हसरूळ येथे घडला.
या प्रकरणी खासगी सावकार विशाल कदम, कैय्याज शेख, विशाल कदमची आई व त्यांचे तीन ते चार साथीदार यांच्याविरुद्ध ॲट्रोसिटीसह सावकारी अधिनियमानुसार विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून,पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त निकम करीत आहेत.
