नाशिक दिनकर गायकवाड आदिवासी भागातील लहान बालकांमधील कुपोषण ही गंभीर समस्या दूर करण्यासाठी सोशल नेटवर्किंग फोरम,नाशिक आणि योग विद्याप्रणीत हिलिंग फाऊंडेशन, साऊथ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने कुपोषणमुक्ती कार्यक्रमाचा शुभारंभ पेठ तालुक्यातील करंजाळी येथे झाला.
प्रमुख पाहणे म्हणून योग विद्या हिलिंग फाऊंडेशन संस्थेचे शिवा मुथुस्वामी, शैलेश भेडा, एसएनएफचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश मोरे, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी पंडित वाकडे, रामदास शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते २० बालकांना प्रातिनिधिक स्वरुपात पोषण आहार वाटप करण्यात
आला.
उर्वरित बालकांसाठीचा आहार अंगणवाडी सेविकांकडे सुपूर्द करण्यात आला.या योजनेंतर्गत पेठ तालुक्यातील १२५ कुपोषित बालकांना वर्षभर सकस पोषण आहार देण्यात येणार आहे. महिन्याला सुमारे दोन लाख तर वर्षभरासाठी २४ लाखांचा निधी योग विद्या हिलिंग फाऊंडेशन उपलब्ध करून देणार आहे.
आहार नियोजन व मार्गदर्शनाची जबाबदारी एसएनएफच्या डॉक्टर्स आणि आहारतज्ज्ञांवर असेल तर प्रत्यक्ष अंमलबजावणीची जबाबदारी एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालय, पेठ यांच्याकडे असेल. अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिका
यांच्यामार्फत सर्व बालकांपर्यंत नियमित आहार पोहोचवला जाणार आहे. योग विद्या हिलिंग फाऊंडेशन संस्थेचे शिव मुथुस्वामी यांनी सांगितले की, एसएनएफ आदिवासी भागात प्रामाणिकपणे कुपोषण निर्मूलनाचे काम करत आहे त्यामुळेच आम्ही पेठ तालुक्यातील या उपक्रमाला साथ दिली असल्याचे ते म्हणाले. प्रास्ताविक प्रमोद गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन रामदास शिंदे यांनी केले तर आभार पंडित वाकडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका,आशा कार्यकर्ती यांनी प्रयत्न केले.
