आश्वी खुर्दच्या श्लोक आणि गायत्री जाधव यांचा ऐतिहासिक उपक्रम होतोय कौतुकाचा विषय
आश्वी संजय गायकवाड दिवाळीच्या सुट्टीत जिथे आजची पिढी डिजिटल युगात मोबाईल गेम्स आणि इंटरनेटच्या आभासी जगात रमलेली असते, तिथे संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द गावातील दोन चिमुकल्यांनी इतिहासाचा 'मातीचा धडा' प्रत्यक्ष साकारून एक प्रेरणादायी उदाहरण समाजासमोर ठेवले आहे. चि.श्लोक अदिनाथ जाधव आणि कु.गायत्री अदिनाथ जाधव या दोघांनी स्वतःच्या हातांनी सुंदर आणि बारकाईने शिवकिल्ला तयार केला असून, त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
डिजिटल युगात वास्तवाचे भान;प्रेरणा'स्वराज्याची मेहनत 'मातीची
अहमदनगर जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षणार्थी उपशिक्षणाधिकारी असलेल्या सौ.प्रिती साईनाथ जाधव यांच्या प्रेरणेतून,त्यांच्या पुतण्या-पुतणीने हा ऐतिहासिक उपक्रम हाती घेतला.सौ.जाधव यांनी मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेचा तेजोमय इतिहास सांगितला.
चारशे वर्षानंतर पुढे हजारो पिढ्यांना शिवरायांचे गड किल्ले आणि इतिहास लोकांना मार्गदर्शक ठरत राहील यात तिळमात्र मात्र शंका नाही.त्यातून स्फूर्ती घेत श्लोक आणि गायत्री यांनी जराही वेळ न घालवता थेट शेतातून माती, दगड आणि आवश्यक साहित्य गोळा केले आणि किल्ल्याच्या उभारणीला सुरुवात केली.
बारकावे जपणारी निर्मिती या चिमुकल्यांनी केवळ किल्ला उभा केला नाही, तर त्याची प्रत्येक रचना अत्यंत बारकाईने आणि अभ्यासपूर्ण केली आहे. या शिवकिल्ल्यात टकमक टोक, मुख्य दरवाजा, पायऱ्या, पाण्याची टाकी, घोड्यांचे तबेले, तोफा,दरबार आणि सिंहासनाची प्रतिकृती जिवंत झाली आहे.
अवघ्या दोन तासांत हे ऐतिहासिक बांधकाम पूर्ण झाले, हे विशेष!चित्रात:श्लोक आणि गायत्री यांनी साकारलेला मातीचा सुंदर शिवकिल्ला.छत्रपती शिवरायांचा दरबार आणि मावळ्यांचा जयजयकार जणू येथे जिवंत झाला आहे. हाच खरा शिक्षणाचा मार्ग या बालकांचा ऐतिहासिक उपक्रम पाहून ग्रामस्थ आणि शिक्षक वर्गाने त्यांचे भरभरून कौतुक केले आहे.
शिक्षकांच्या मते, "आजच्या पिढीला नुसता शाब्दिक नव्हे, तर असा अनुभव देणेच खरा शिक्षणाचा मार्ग आहे. यामुळे इतिहासाचे संस्कार त्यांच्या मनावर खोलवर रुजतात."श्लोक आणि गायत्री यांचा हा उपक्रम स्पष्ट करतो की, मोबाईलच्या युगातही मुले मातीशी, संस्कारांशी आणि शिवरायांच्या तेजस्वी आदर्शांशी जोडलेले राहू शकतात. हा किल्ला म्हणजे स्वराज्याच्या तेजाची आणि बालमनातील सृजन शक्तीची एक सुंदर चूणूक आहे.
