दोन-तीन दिवसांपूर्वी फेसबुक पाहत असताना कोणीतरी एका जुन्या वाड्याचा फोटो टाकला होता.अर्थात, वाडा हा पाटलांचा होता. त्या पाटलांनी तीनशे-चारशे वर्ष जुना हा आपला वाडा आजही कसा मेंटेन ठेवला आहे आणि त्यात वास्तव्य करत आहेत, याबद्दल पोस्टकर्त्यांनी भरपूर कौतुक व अभिमान व्यक्त केला होता.कारण पोस्ट करणारा हा पाटीलच होता.
लौकिकदृष्ट्या माझ्या जातीचाच होता.हे वाडा पुराण पाहून त्याखालील प्रतिक्रिया वाचण्याची माझी उत्सुकता चाळवली. सर्व प्रतिक्रिया वाचून आपल्या या जातीत जन्म झाला याबद्दल मला खरोखर धन्य वाटले.माझे असंख्य जातीबांधव जुने वाडे, परंपरा, संस्कृती व इतिहास यासंदर्भात उर भरून अभिमान व्यक्त करत होते. अनेक जण आमचाही असाच वाडा आहे असे सांगून त्याबद्दल माहिती देत होते. आपण आपल्या या वाड्यांचे जतन कसे प्राणपणाने केले पाहिजे याबद्दल विचार व्यक्त करत होते. माझ्या मनात अभिमान व अंगावर रोमांच येत होते.
पोस्ट मधला वाडा मराठवाड्यातला होता. या वाड्यातील पूर्वजांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर समाजाचे कसे रक्षण केले, आपल्या दातृत्वाच्या माध्यमातून समाजाचे कसे पोषण केले याबद्दल सांगितले होते. एवढेच नव्हे, तर छत्रपती शिवरायांना कसे सहकार्य केले होते असे बरेच काही दाखले देण्यात आले होते.
माझ्या मनात त्यावेळी सहज प्रश्न निर्माण झाला: शिवरायांचे स्वराज्य त्यांच्या हयातीत आणि त्यानंतरही मराठवाड्यापर्यंत पोहोचले होते का? स्वातंत्र्यानंतरही निजामाच्या तावडीतून मराठवाड्याची सुटका करून घ्यावी लागली, त्यासाठी संघर्ष करावा लागला.
अशावेळी वाड्यातील पूर्वजांनी कुठे व कधी पराक्रम गाजवला हे समजले नाही. हल्ली माझ्या जातीतील सगळ्याच सरंजामदार घराण्यांनी स्वराज्य स्थापनेत शिवरायांना साथ दिल्याची सांगितले जाते. इतिहास पाहिला तर शिवरायांना परकियांपेक्षा स्वकियांशीच अधिक संघर्ष करावा लागला. असो! हे सर्व वाडा पुराण सांगण्याचे कारण असे आहे की, भाड्याच्या घरात राहणारे माझे अनेक वर्तमानकालीन व जातीय बांधव वाडा संस्कृतीच्या अभिमानाने फुलून येत होते.
एक मराठा म्हणून माझी एवढीच तळमळ आहे की, या समाजाने काळाची पावले ओळखून व काळसुसंगत विचारधारा, दृष्टिकोन व जीवनशैली यांचा स्वीकार करायला हवा. शिवराय-शंभूराजे, सर्व बहुजन संत आणि समाजसुधारक बहुजन महामानव यांच्या विचारांची कास धरून समाजात आमूलाग्र बदल होणे आवश्यक आहे.
त्याऐवजी आपण स्वतःला वाडा व गावगाडा याच्यात बांधून घेण्यात धन्यता मानत आहोत. जो समाज काळसुसंगत राहत नाही, त्याच्या नशिबी भविष्यात गुलामी येत असते, याची जाणीव आपल्याला व्हायला हवी. रूढी, परंपरा, संस्कृती इत्यादी गोष्टी या काळाच्या ओघात बदलत असतात.
हे झालेले बदल आपल्याला स्वीकारता आले पाहिजेत. या ऐवजी आपण इतिहासाला म्हणजेच भूतकाळाला कवटाळून बसलो आहोत. त्यासाठी सर्व स्तरांवर प्रयत्न करणारी यंत्रणा स्वार्थी प्रवृत्तीने उभी केलेली आहे. शिवराय-शंभूराजे यांचा विशाल व्यापक दृष्टिकोन याचा आपल्याला विसर पाडून, स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांच्या महान विचारांना संकुचित करून सांगणारे लोक आपल्या भोवती आहेत.
आपल्या बहुजन संतांच्या पुरोगामी सुधारणावादी विचारांऐवजी दैववादी विचार आपल्यावर झोपवणारे लोक आपल्या अवतीभवती आहेत. आधुनिक काळातील आपल्या बहुजन महामानवांना जाती-जातीत विभागून आपल्याला एकमेकांच्या विरोधात उभे करणारे लोक आपले नेते होत आहेत. याचा विचार समाजाने करणे अत्यंत गरजेचे आहे. जुनाट वाड्यांमधली व गढ्यांवरली भूतं आजही आपण मानगुटावर घेऊन जर फिरलो, तर येणारा काळ व पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत.
लेखक राहुल हांडे संगमनेर
