कधी एकेकाळी दिवाळीचा फराळ म्हणजे पर्वणी असायची. वर्षभरात कधीच खायला न मिळणाऱ्या पदार्थांचा येथेच उपभोग दिवाळी फराळाच्या निमित्ताने घेता येई असे. तो काळ सर्वांगीण अभावाचा होता. त्यामुळे दिवाळीच्या फराळाला खूप भाव होता.
त्याचबरोबर आपल्या घरी झालेल्या फराळाचा आस्वाद शेजारी-पाजारी, स्नेहीजन, नातेवाईक इत्यादी सर्वांनी घ्यावा, ही प्रत्येकाची तळमळ असायची. यामागे अभावपूर्ण आयुष्यात एकमेकांची अपरिहार्य गरज आणि निर्व्याज प्रेम म्हणून व्यक्त होत होते. हे प्रेम एकमेकांवर अवलंबून असल्यामुळे होते, हे वास्तव आहे.
याला उगाच कोणत्या ललित लेखनाच्या शाब्दिक कोंदणात बसवून त्याचे उदात्तीकरण करणे आवश्यक नाही. अन्यथा ललित लेखन करणाऱ्यांनी भूतकाळ अति रम्य अशी एक धारणा लोकांच्या मनात निर्माण करून ठेवली आहे. अशा लोकांच्या नॉस्टेलजिक अथवा स्मरणरंजक लेखनामुळे मराठी वाचकांना काळातील मागील वास्तव शोधण्याची सवयच लागली नाही.
असो!एकेकाळी एकमेकांच्या घरी जाऊन फराळाचा आस्वाद घेणे हे एकमेकांवरील प्रेम व्यक्त करण्याचे माध्यम होते. माणसे एकमेकावर अवलंबून असल्यामुळे त्यांना एकमेकाची किंमत होती. फराळातील एकेका आयटमबद्दल एकेक घर एकमेकांत प्रसिद्ध होते.
तो पदार्थ खावा तर त्याच घरचा, अशी धारणा पक्की असायची. यामागे अभावग्रस्त असले तरी माणसाचे जीवन शांत होते, स्थिर होते आणि निवांत होते. फराळातील पदार्थांच्या चवीवर व वैशिष्ट्यांवर विचार करायला सुद्धा माणसांकडे भरपूर वेळ होता. त्यामुळे पदार्थांची चव जशी जिभेवर रेंगाळायची, तसेच मनातही रेंगाळत राहायची.
माझे आजोळ अमरावती असल्यामुळे माझी प्रत्येक दिवाळी मामांकडेच साजरी झाली.वऱ्हाडातील आदरातिथ्य व आपुलकी याचे संस्कार त्यामुळे माझ्यावर निश्चितच आहेत. दिवाळीला अमरावतीला गेल्यानंतर माझी आजी व माम्या मला आवडणारी पिठीची करंजी आवर्जून बनवत होत्या.
तरी आजूबाजूच्या आज्या व माम्या देखील सगळ्यात लांबून म्हणजे संगमनेरवरून येणारा नातू म्हणून माझ्यासाठी त्यांचे खास फराळी आयटम लक्षात ठेवत होत्या. सगळ्या घरांत आवर्जून मला फराळाला बोलावले जायचे. पुष्पाचे म्हणजे माझ्या आईचे पोरगं एवढ्या लांबून दिवाळीला आजोळी येतं, याचे प्रत्येकाला कौतुक होते. मी देखील दिवाळीची आतुरतेने वाट पाहायचो.
फराळाच्या निमित्ताने मामांकडे येणाऱ्या त्यांच्या मित्रांसोबत व नातेवाईकांसोबत आवर्जून भेटी व्हायच्या. असा फराळ प्रेमाचा एक वेगळाच माहौल अनुभवता यायचा, जो मनावर कायमचा कोरला गेला आहे. हे सगळं सांगण्याचे व आठवण्याचे कारण एकच आहे.
आज सगळ्यांकडे सगळ्याची मुबलकता आहे.पूर्वी जे फक्त दिवाळीला खायला मिळायचे, ते हल्ली वर्षभर घरात पडलेले असते. कोणी कोणाला फराळाला बोलवत नाही आणि कोणी कोणाकडे दिवाळीत जात नाही. फराळ देण्याच्या भीतीने अनेक जण एकमेकांकडे जात देखील नाही.
तरी देखील प्रत्येक घरी दिवाळी आली की किराणा भरणे, काही पदार्थ घरी बनवणे, काही आचारीकडून बनवून घेणे तर काही रेडीमेड विकत आणणे अशी धावपळ चाललेली दिसते. अशा वेळी माझ्या मनात सहज प्रश्न येतो, जर घरचेही मन लावून फराळ खाणार नाही आणि बाहेरचीही येणार नाही,
तर हा फराळी गदारोळ का बरं? या प्रश्नाचे उत्तर शोधत खोलवर गेल्यानंतर असे लक्षात येते की प्रत्येकाची क्रयशक्ती वाढल्यामुळे दिवाळीला मी कसा किराणा भरतोय, कसा फराळ बनवतोय अथवा बनवून घेतोय किंवा विकत आणतोय हे एकमेकांना दाखवण्यासाठी तर हे चाललेले नसेल. फराळाची उत्सुकता, उत्कंठा व आवश्यकता संपलेल्या काळात या सोंग-ढोंगांना अधिक महत्त्व आले आहे. फराळ आता खाण्याची व खाऊ घालण्याची गोष्ट राहिली नसून केवळ बनवायची व दाखवण्याची गोष्ट झाली आहे. याचाच अर्थ फराळ आता निव्वळ फॅशन झाली आहे.
लेखक राहुल हांडे -संगमनेर
