नाशिक दिनकर गायकवाड आभासी चलनात गुंतवणूक करण्यास सांगून सिन्नरच्या व्यापाऱ्याची तब्बल ६४ लाखांची फसवणूक करणाऱ्या सायबर भामट्यास गजाआड करण्यात नाशिक ग्रामीणच्या सायबर शाखेला यश आले आहे.
अमेय जैन (वय २९, रा. अत्रेय राजराजेश्वरी, काळेनगर, नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी फसवणूक झालेल्या सिन्नरच्या व्यापाऱ्यास दोन लाख २ हजार रुपये परत मिळवून दिले.
सिन्नरच्या एका व्यापाऱ्याची शेअर मार्केट मध्ये गुंतवणुक करण्यास सांगून त्यांना अनोळखी व्हॉटसप मोबाईल नंबर वरून संपर्क करून ट्रस्ट इंडिया डॉट कॉम या वेबसाईटवर क्रिप्टो करेंसीमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले.नंतर त्यांना व्हॉट्सपॲप ग्रुपद्वारे एका ॲपची लिंक पाठविली त्यांनी ती ओपन केली असता त्यांचे मोबाईलमध्ये बायनान्स या नावाचे ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले.
त्याप्रमाणे तक्रारदार यांनी सदरचे ॲप प डाऊनलोड केले व त्यावर यूडीएसटीची खरेदी केलो.तक्रारदार यांचा विश्वास संपादन करून सायबर भामट्यांनी वेळोवेळी ट्रस्ट इंडिया डॉट कॉम या वेबसाईटवर पैसे गुंतविण्यास सांगून विविध बँक खात्यांवर तक्रादारकडून पैसे स्वीकारून एकूण ६४ लाख ८० हजार ५०० रुपयांची फसवणूक केली आहे. याबाबत सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्ह्याचा तपास नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मागदर्शनाखाली नाशिक ग्रामीण सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नागेश मोहिते, उपनिरीक्षक पाराजी वाघमोडे, हवालदार सुवर्णा आहिरे,सुनील धोक़ट,आकाश अंबोरे,हेमंत गिलबिले,प्रदीप बहिरम यांनी करून गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करत त्यास नाशिक शहरातून अटक केली.
