अकोले विशाल वाकचौरे चांद्यापासून बांद्यापर्यंत सर्वसामान्यांच्या घराघरात प्रकाश पसरवणारे, ‘प्रकाशदूत’ म्हणून ओळखले जाणारे वीज कर्मचाऱ्यांनी यंदाची दिवाळी मात्र अंधारात साजरी करत केली.
महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना अद्याप सानुग्रह अनुदान (बोनस) न मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर नाराजीचे सावट आहे.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी राज्यातील तिन्ही सार्वजनिक ऊर्जा कंपन्या — महापारेषण, महावितरण आणि महाजनको — यांच्या कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. महाजनको व महापारेषण कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली असली, तरी महावितरण कंपनीने आर्थिक परिस्थिती बिकट असल्याचे कारण देत बोनस प्रस्ताव थांबवला आहे. परिणामी, महावितरण कर्मचाऱ्यांना कंपनीच्या इतिहासात पहिल्यांदाच ऐन दिवाळीत सानुग्रह अनुदानापासून वंचित राहावे लागले आहे.
यातच दिवाळीपूर्वी झालेल्या खाजगीकरणा विरोधातील संपात सहभागी झाल्याने कर्मचाऱ्यांचे दीड दिवसाचे वेतन कपात करण्यात आले असून, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून आणखी एक दिवसाचे वेतन कपात केले जात आहे. या दुहेरी आर्थिक फटक्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
“आम्ही जनतेच्या घरात उजेड आणतो, पण आमच्या घरात मात्र अंधार आहे,” असे अनेक वीज कर्मचाऱ्यांचे भावनिक उद्गार आहेत.जनतेची दिवाळी उजेडात साजरी व्हावी,म्हणून रात्रंदिवस काम करणाऱ्या या प्रकाशदूतांची स्वतःची दिवाळी मात्र अंधारमय झाल्याचे चित्र दिसत आहे.
