नाशिक दिनकर गायकवाड सुरगाणा तालुक्यातील घाटमाथा परिसरात गुरुवारी रात्री दोनवेळा भूकंपाचे अतिसौम्य धक्के जाणवले. त्यामुळे वांजुळपाडा, नागशेवडी, मोहपाडा,चिराई आणि शिंदे गाव परिसरात काहीकाळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनाने नागरिकांना सावधानता बाळगण्याचे आवाहन केले आहे.
मेरी येथील भूकंपमापन केंद्रातील नोंदीनुसार या धक्क्याची तीव्रता अत्यंत सौम्य म्हणजेच २.१ रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली आहे. गुरुवारी रात्री सव्वानऊ वाजता पहिला आणि साडेअकरा वाजता भूकंपाचा दुसरा अतिसौम्य
धक्का जाणवला.या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नसल्याचे सूत्रांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. गेल्या महिन्यात १६ सप्टेंबर रोजीदेखील घाटमाथ्यावर भूकंपाचे धक्के बसल्याची चर्चा होती. मात्र त्याची मेरी येथील भूकंपमापन केंद्रात अधिकृत नोंद झाली नव्हती. तहसीलदार रामजी राठोड यांनी ग्रामसभांच्या माध्यमातून सतर्कतेचा सल्ला देत सुरक्षेचे निकष पाळण्याचे आवाहन या भागातील नागरिकांना केले आहे. या भागात यापूर्वीही अशा सौम्य भूकंपाचे धक्के जाणवल्याचे सरपंच पुंडलिक पवार यांनी सांगितले. ग्रामस्थांनी पुरेशी काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
