नाशिक दिनकर गायकवाड गुन्हेगारी टोळी निर्माण करून खंडणी, धमकावणे,हाणामारी करत दहशत माजविणाऱ्या पी. एल गँगचा मुख्य सूत्रधार प्रकाश मोगल लोंढे ऊर्फ बॉस व त्याच्या टोळीतील सदस्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
सातपूर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या पी.एल गँगचा मुख्य सूत्रधार प्रकाश मोगल लोंढे ऊर्फ बॉस व त्याच्या टोळीतील सदस्य यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी प्रकाश लोंढेसह त्याच्या सदस्यांविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश सोमवारी (दि.२७) निर्गमित केले.
प्रकाश मोगल लोंढे व त्याचे टोळीतील सदस्यांनी गुन्हेगारी टोळी संघटीतरित्या हिंसाचाराचा,अवैध शस्त्रांचा वापर करून धाक दपटशा दाखवून आर्थिक फायद्यासाठी हप्ते गोळा करणे, परिसरात वर्चस्व निर्माण करून खंडणी वसूल करणे याप्रकारे बेकायदेशीर कृत्य चालू ठेवले.
संशयितांनी नियोजनबद्ध कट रचून गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तसेच संशयित आरोपींनी संघटीतरित्या गुन्हा केल्याने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून गुन्ह्यातील संशयित आरोपी विरुद्ध कठोर कारवाई करण्यासाठी वाढीव कलमे लावून मोक्का कायद्याअंतर्गत ठोस कारवाई करण्यात आली आहे.
पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त,अंबड विभाग नाशिक शहर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.बंगला बळकावून खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यात पोलीस कोठडीत असलेल्या प्रकाश लोंढेसह त्याच्या मुलगा दीपक लोंढे न्यायालयीन कोठडीत आहेत.
सातपूर गोळीबार प्रकरणात पसार झालेल्या संशयितांचा नाशिक शहर पोलीस शोध घेत आहेत. पोलिसांनी संदीप रमेश गांगुर्डे व शुभम निकम यास अटक केली आहे.
प्रकाश मोगल लोंढे उर्फ बॉस, शुभम उर्फ भु-या राजु पाटील, दुर्गेश संतोष वाघमारे, आकाश ऊर्फ अभिजीत राजु अडांगळे, दीपक उर्फ नानाजी प्रकाश लोंढे, संतोष शेट्टी पवार उर्फ जल्लाद, अमोल बाबासाहेब पगारे, देवेश गजानन शेरताठे, शुभम रामगिर गोसावी, सनी उर्फ ललीत अशोक विठ्ठलकर, भूषण प्रकाश लोंढे उर्फ भाईजी, प्रिंस चित्रसेन सिंग, शुभम चंद्रकांत निकम वेदांत संजय चाळगे, राहुल सत्यविजय गायकवाड, निखील मधुकर निकुंभ, संदीप रमेश गांगुर्डे या संशयितांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
